त्यांच्या घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

By admin | Published: June 19, 2017 12:29 AM2017-06-19T00:29:35+5:302017-06-19T00:29:35+5:30

गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.

Their home still has not 'bright' | त्यांच्या घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

त्यांच्या घरी अजूनही आली नाही ‘उज्ज्वला’

Next

सरपणाची तयारी : जीव टांगणीला, आरोग्याला धोका
राजू बांते । लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : गरीब परिवारातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली. तथापी, अनेक गरीब महिलांच्या घरी उज्वला पोहचलीच नाही. आजही गरीब महिला परंपरागत चूलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.
ग्रामीण भागात उर्जेची सर्वात मोठी गरज स्वयंपाकासाठी लागते. यातील जास्त भाग जळण व लाकुडफाटा पुरविला जातो. पुर्वापार चालत असलेल्या चूलीमध्ये ही लाकडे जाळण म्हणून वापरतात. अशा चूलीची अन्न शिजविण्याची क्षमता अधिकच कमी म्हणजे सुमारे १० टक्के एवढीच असते. त्यामुळे जळण मोठ्या प्रमाणावर लागते. ते मिळविण्यासाठी स्त्रियांना व मुलांना वणवण करावी लागते. शिवाय चुलीच्या वापराने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होतो. तो धूर स्वयंपाक घरात कोंडत असल्यामुळे महिलांच्या आरोग्यास धोकादायक असतो.
गरीब महिलांचे सशक्तीकरण सोबतच आरोग्याची सुरक्षा व्हावी या प्रमुख हेतुने केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ग्रामीण भागातील अनेक गरीब महिलांच्या घरी गेलीच नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. मोहाडी तालुक्यात ९,९७९ हजार गरीब रेषेखालील शिधापत्रिका आहेत. त्यापैकी केवळ २२९९ गरीब महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस कनेक्शन देण्याची टक्केवारी २३.०३ एवढी आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र महिलांना गॅस एजन्सी वितरण केंद्रात जावून आॅनलाईन आवेदन पत्र भरावे लागते. बीपीएल प्रमाणपत्रासह दहा प्रकारचे दस्ताऐवज सादर करावे लागते. गरीब महिलांना गॅस कनेक्शन मोफत दिल्या जातो. पण, शेगडी व इतर साहित्यासाठी दोन हजाररुपयापर्यंत रुपये खर्च करावे लागतात. एकदा की कनेक्शन मिळाला तर त्यानंतर मिळणाऱ्या गॅस सिलेंडरचे पैसे भरावे लागतात. वरकरणी उज्वला योजना मोफत वाटत असली तरी तिच्यावर गरीबांना रुपये खर्च करावेच लागतात.
गॅस कनेक्शन शिवाय इतर साहित्य घेण्यासाठी महिलांना लोन घेण्याची सुविधा आहे. पण, ही लोन प्रक्रिया त्रासदायक असल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्याची स्थिती बघितली तर दत्तप्रभू गॅस एजन्सी जांबला ९१० कनेक्शन जोडली गेली आहेत. निशा गॅस एजन्सी वरठी ३५९ व डोहळे गॅस एजन्सी करडी यांना१०३० कनेक्शन उज्वलाची जोडली गेली आहेत.
तालुक्यात ७७ टक्के महिलांच्या घरी उज्वला न जाण्याला प्रशासन जबाबदार आहे. खेड्यात अजूनही गरीबांना उज्वला विषयी निटपणे माहिती नाही. खऱ्या गरीबांच्या घरी उज्वला जाण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला नाही. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली पाहिजेत. काही गॅस एजन्सी ठराविक रुपये घेत नसल्याची ओरड आहे. गॅस कनेक्शन देण्यात समानता नसल्याचे बोलले जाते. अनेक गरीब महिलांनी गॅस कनेक्शनसाठी अर्ज करुनही लाभ मिळाला नाही. याला काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. गॅस कनेक्शन मोफत देणारी सरकार कितीही गवगवा करीत असली तरी गॅस कनेक्शन घेतेवेळी महिलांना काही रुपये मोजावे लागतात ही वास्तविकता आहे. त्यापुढे तर गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसा दयावाच लागतो. पावसाळ्यात सरपणासाठी परिसरातील शिवारात जावे लागते. सकाळी निघून लाकूड फाटे जमा करुन डोक्यावर आणणाऱ्या गरीब महिला आहेत.
या महिलांना सरपणासाठी रानात बाहेर जावे लागते. त्यामुळे हिंस्र पशूचा मोठा धोका असतो. तसेच विकृत मनोवृत्ती असलेल्या मानवाची भिती कायम असते.

ग्रामीण भागात जागरुकतेची कमतरता आहे. उज्वला विषयी परिपूर्ण माहिती नाही. लाभार्थी महिलांना लाभ माहिती देण्यासाठी मेळावे घेतले जातील.
- सुर्यकांत पाटील, तहसिलदार मोहाडी
उज्वला गॅस कनेक्शनसंबंधी काम प्रगतीवर आहे. दरमहिन्याला केरोसीनचा होणारा साठा कमी होत आहे. स्थानिक जनप्रतिनिधींनी गरीब महिलांना लाभ मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- धनंजय देशमुख, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी,भंडारा

Web Title: Their home still has not 'bright'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.