-तर चौधरींना राजीनामा मागू
By admin | Published: July 11, 2016 12:29 AM2016-07-11T00:29:08+5:302016-07-11T00:29:08+5:30
जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले रामलाल चौधरी हे काँग्रेस पक्षाचे आहेत.
सेवक वाघाये : जिल्हा दूध संघाची निवडणूक
भंडारा : जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी निवडून आलेले रामलाल चौधरी हे काँग्रेस पक्षाचे आहेत. दबावात येवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याचा आरोप माजी आमदार सेवक वाघाये यांनी पत्रपरिषदेत केला.
जिल्हा दूध संघाची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संयुक्तरित्या लढविली होती. चौधरी हे काँग्रेसमध्ये असतानाच दूध संघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केला होता. काँग्रेस पक्षातून निवडून आल्यानंतर पक्षाची ताकत वाढत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला. चौधरी हे बाजार समितीचे सभापती आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत अनेकांचा विरोध असताना आम्ही त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली. गावातही काँग्रेस पदाधिकारी म्हणून ते वावरतात. दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार अध्यक्ष बनत असल्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेचे सभापती विनायक बुरडे यांचे नामांकन अर्ज दाखल केले नाही. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा जनतेची दिशाभूल करणारा आहे. एका पक्षात निवडून यायचे आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा. अशा लोकांना जनता माफ करत नाही, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, माजी नगराध्यक्ष बशिर पटेल उपस्थित होते. या संदर्भात दूध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. (जिल्हा प्रतिनिधी)