तुमसर तालुक्यात ५५ कुष्ठरुग्णाची नोंद
By admin | Published: November 18, 2015 12:40 AM2015-11-18T00:40:39+5:302015-11-18T00:40:39+5:30
पोलिओ आजार हद्दपार करण्याचा संकल्प केंद्र शासनाने घेतला, त्याच धर्तीवर कुष्ठरुग्णांची संख्या
जनजागृतीचा अभाव : आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज
तुमसर : पोलिओ आजार हद्दपार करण्याचा संकल्प केंद्र शासनाने घेतला, त्याच धर्तीवर कुष्ठरुग्णांची संख्या शुन्यावर आणण्याकरिता केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर तालुक्यात कुष्ठरुग्णांची संख्या ५५ इतकी आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात कुष्ठरुग्णांवर मोफत उपचार केल्या जाते. याकरिता केंद्र व राज्य शासन विविध कार्यशाळा, साहित्यांचे मोफत वाटप करते, परंतु या आजाराविषयी जनजागृतीचा अभाव दिसून येतो. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकात जागृतीची गरज आहे. तुमसर तालुक्यात कुष्ठरुग्णांची संख्या ५५ आहे. यात उपसांसर्गीक ९ व सांसर्गीक ४६ रुग्णांचा समावेश आहे.
तुमसर तालुक्यात तुमसर शहरातील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी, नाकाडोंगरी, लेंडेझरी, चुल्हाड, गोबरवाही येथे कुष्ठरुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. शासनाने कुष्ठरुग्ण तंत्रज्ञाची नियुक्ती केली आहे. शासनाकडून कुष्ठरुग्णांना उपचाराकरिता एक कीट देण्यात येते. आरोग्य विभाग येथे कुष्ठरोगाबाबत मार्गदर्शन करते.
या आजाराबाबत भ्रामक कल्पनांच्या आहारी न जाता नियमित व योग्य उपचार पद्धतीचा अवलंब केला तर हा आजार पूर्णत: बरा होतो. परंतु रुग्ण उपचारावर लक्ष केंद्रीत करीत नसल्याने आजाराची व्याप्ती वाढत जाते. पोलिओ आजाराबात जशी जनजागृती केंद्र व राज्य शासन राबविते तशी जनजागृती या आजारात राबवित नसल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)