तुमसरमध्ये ३२ गावांसाठी केवळ ६५ पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:34 PM2018-10-02T21:34:02+5:302018-10-02T21:34:53+5:30
जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे कार्यरत पोलिसांवर कामांचा ताण वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्ह्यात संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमसर ठाण्याच्या हद्दीतील ३२ गावांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ ६५ पोलिसांवर आली आहे. पोलिसांची ३० पदे तीन वर्षांपासून रिक्त आहेत. मात्र संवेदनशील शहरात पोलिसांच्या नियुक्तीबाबत गृहविभाग दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे कार्यरत पोलिसांवर कामांचा ताण वाढत आहे.
तुमसर शहराचा क्राईम रेट वाढत आहे. तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहरासह ३२ गावे येतात. येथे पोलिसांची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३० पदे गत तीन वर्षांपासून रिक्त आहेत. यामुळे येथील कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. ६५ पोलिसांवर जबाबदारी असली तरी खऱ्या अर्थाने त्यापेक्षाही कमी कर्मचारी ठाण्यात कार्यरत असतात. कारण दररोज साप्ताहिक सुटीवर आठ ते दहा पोलीस असतात. बंदोबस्ताकरिता चार, हरविले तपासणीसाठी दोन, गार्ड म्हणून तीन, चार वाहतूक पोलीस नियुक्त आहेत. प्रत्यक्षात पोलीस ठाण्यात १२ ते १३ कर्मचारी कर्तव्य बजावतात. देव्हाडी येथील पोलीस चौकीत तीन ते चार कर्मचारी आहेत. परंतु सध्या ते क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे सायंकाळी चौकी कुलूपबंद असते.
याशिवाय दैनंदिन कार्यरत, न्यायालय, वायरलेस, आॅनलाईन डायरी, भंडारा न्यायालयात नियुक्ती आदींमुळे पोलिसांच्या मुख्य कामावर दुर्लक्ष होत आहे. बीट वाटून दिले असले तरी पोलिसांच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी ठाण्याचे लेखापरिक्षण होते. त्यावेळी जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात. त्यांचा अहवाल शासनाकडे पाठविला जातो. परंतु त्यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही.
जिल्हा स्तरावर पोलीस दक्षता समिती आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या व निराकरणाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही माहिती देते. परंतु येथील कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जात नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पोलिसांवर कामांचा ताण वाढता कामा नये. कारण त्यांना २४ तास कर्तव्य बजवावे लागते. शासनाने तात्काळ रिक्त पदे भरण्याची गरज आहे. संवेदनशील तुमसर शहर व ३२ गावांकडे शासनाने लक्ष द्यावे.
-डॉ.पंकज कारेमोरे, युवक काँग्रेस, तुमसर.