साकोली शहरात एकही सुलभ शौचालय नाही; पाच वर्षात एकही नवीन शौचालय बांधले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 02:33 PM2024-10-02T14:33:05+5:302024-10-02T14:33:33+5:30
'विना शौचालयाचे शहर' : सोशल मीडियातून उडविली जातेय खिल्ली
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शीर्षक वाचून दचकलात ना... पण हे खरे आहे. पाच वर्षात साकोली नगरपरिषदेने एकही सुलभ शौचालय काय मूत्रीघरही निर्माण केले नाही. त्यामुळे सोशल मीडियात विना शौचालयाचे शहर, अशी खिल्ली उडविली जात आहे. दोन वर्षापासून साकोलीत प्रशासकराज सुरू आहे. परंतु, या काळातही जनतेला विश्वासात न घेता चक्क शासकीय पैशाची उधळपट्टी केली जात असताना साधे सुलभ शौचालय का बांधले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी ब्रिटिशकालीन तहसील म्हणून साकोलीची ओळख आहे. सन २०१६ ला नगरपरिषदेची स्थापना झाली. पण, काहीच फायदा झाला नाही. साकोली पूर्वी जशी होती, तशीच आजही आहे. फक्त एनएचएआय निर्मित उड्डाणपूल सोडला तर काहीही झालेले नाही. पूर्वीचे सोडले तरी पाच वर्षांत महामार्गावर महिलांसाठी व प्रवाशांसाठी सुलभ शौचालय बांधण्याची कुणालाही मनातून इच्छा नव्हती काय, असा प्रश्न आहे.
काही म्हणतात, नगरपरिषदेकडे शासकीय जागा नाही. मग, शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे हटवून शौचालय का निर्माण केले जात नाही. असाही सवाल उपस्थित होत आहे. मागील दोन वर्षांपासून येथे प्रशासक राज सुरू आहे. मागील व विद्यमान अधिकाऱ्यांनीसुद्धा हे धाडस का दाखविले नाही? मात्र, जेथे कमाई होईल, असे महान कार्य ते करून गेले. यात गरज नसताना जवळजवळ दोन फायबर स्पिड ब्रेकर थोपविणे, सोलर पथदिवे, ओला कचरा व सुका कचऱ्यासाठी प्लास्टिक बादल्या आणून लाखो रुपयांचा शासन निधी खर्ची घातला.
उघड्यावरच जावे लागते लघुशंकेला
साकोली हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणे, भूमी अभिलेख कार्यालय, अशी विविध शासकीय कार्यालये आहेत. हजारो नागरिक येत असतात. मात्र, त्यांना उघड्यावरच शौचास व लघुशंकेला जावे लागते.