तेलही नाही अन् सिलिंडरही मिळतोय तोही रिकामा. .!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 05:00 AM2022-06-24T05:00:00+5:302022-06-24T05:00:14+5:30
किचन शेडमध्ये तेलाचं भांडच नाही तर धान्य कसे शिजवावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे तेल खरेदीचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडणार असल्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार देणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून धान्यसाठा शाळांना वितरित करण्यात आला आहे. मात्र, तेल वगळण्यात आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शालेय पोषण आहाराच्या धान्यासोबत तेल दिले गेले नाही तसेच सिलिंडरचा गॅस हंडा रिकामा मिळू लागला आहे. आता तेल नाही अन् सिलिंडरही रिकामा, त्यामुळे शालेय पोषण आहार शिजवायचा कसा, अशा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे निर्माण झाला आहे. तेलाचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या धान्यादी मालामध्ये आतापर्यंत तेलाचा पुरवठा करण्यात येत होता; परंतु यंदा तेलाचे धान्यादी मालासोबत पॉकेट वितरित करण्यात आले नाही.
म्हणजे, किचन शेडमध्ये तेलाचं भांडच नाही तर धान्य कसे शिजवावे, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे तेल खरेदीचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडणार असल्यामुळे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहार देणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यासाठी पुरवठा विभागाकडून धान्यसाठा शाळांना वितरित करण्यात आला आहे. मात्र, तेल वगळण्यात आले आहे. शाळा स्तरावरच तेल खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आजघडीला गोडेतेलाचे भाव एका किलोमागे १६० ते १८० रुपये आहे. तेलाचा भाव वाढतच जात आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांना स्वखर्चातून तेल खरेदी करावे लागणार आहे. मुख्याध्यापकांना आर्थिक व मानसिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. असे असताना शालेय पोषण आहार शिजवावाच लागेल. प्रशासनाकडून आलेली सूचना पाळावीच लागणार आहे. नाही पाळली तर कारवाईस पात्र, असा अप्रत्यक्ष दम प्रशासनाकडून दिला जात आहे तसेच आता किचनशेडमधून धूर येणे बंद होणार आहे.
चुलीच्या जागी गॅस सिलिंडर येणार आहे. शासनाकडून गॅस सिलिंडर खरेदी करण्यासाठी ४ हजार ९० रुपये जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील काही शाळांनी गॅस सिलिंडर खरेदी केला. पण, तो सिलिंडर रिकामा दिला गेला आहे.
गॅस सिलिंडर भरायला वेगळे रुपये लागतील असे सांगितले जात आहे. आता एक गॅस सिलिंडर रिफिल भरण्यासाठी मुख्याध्यापकांना एक हजार रुपयाच्यावर आपले खिसे खाली करावे लागणार आहेत.
असंतोष कायम
- शासनाकडून '' तेलही नाही अन् धान्य शिजविण्यासाठी सिलेंडर खाली '' अशी अवस्था झाली आहे. या प्रकारामुळे मुख्याध्यापकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासन व प्रशासनाने शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गोडे तेलाचा तात्काळ पुरवठा करावा. तसेच एका शाळेला गॅस शेगडी व भरलेले दोन सिलेंडर पुरविण्यात यावे. तसेच विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात गॅस सिलेंडर पुरवठा करण्यात यावा अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजू बालपांडे, सचिव राजू बांते, उपाध्यक्ष रेखा भेंडारकर, प्रमोद धार्मिक, अर्चना बावणे, विष्णुदास जगनाडे, राधेश्याम धोटे, सुनीता तोडकर, कुंदा गोडबोले, वीपीन रायपूरकर, राजू भोयर, सुनील घोल्लर, गोपाल बुरडे आदी पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांना निवेदनातून केली आहे.