तिथे घराघरांतून निनादतो स्वातंत्र्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 10:27 PM2017-08-14T22:27:45+5:302017-08-14T22:28:08+5:30
१५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीण सण. झेंडावंदन, सलामी, प्रभातफेरी, घोषणा व भाषणे हा सर्वत्र दिसणारा .....
हरिश्चंद्र कोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विरली (बुज) : १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीण सण. झेंडावंदन, सलामी, प्रभातफेरी, घोषणा व भाषणे हा सर्वत्र दिसणारा राष्ट्रीय सणाचा सर्वसाधारण परिपाठ. परंतु लाखांदूर तालुक्यातील ढोलसर या लहानशा खेडेगावाने मागील ५८ वर्षांपासून राष्ट्रीय सणाचा वेगळाच परिपाठ जपला आहे. येथे स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी प्रभातफेरीची पुजा होते व घरांघरातून निनादतो राष्ट्रपे्रमाचा जल्लोष.
राष्ट्रीय सणाला गावातील प्रत्येक घरातील गृहिणी आपल्या दारासमोर सडासंमार्जन करून छान रांगोळी घालते. गावातील सर्व मार्गावरून प्रभातफेरी काढली जाते. यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, गावातील पुढारी, तरूण वर्ग व गावकरी सहभागी होतात.
एका खुर्चीवर महात्मा गांधींचा फोटो ठेऊन ती खुर्ची डोक्यावरून प्रभातफेरीसोबत फिरविली जाते. प्रत्येक दारापुढे ही प्रभातफेरी थांबते. त्या घरातील गृहिणी पंचारतीने बापूंच्या प्रतिमेला ओवाळून पूजा करते. प्रभातफेरीतील ज्येष्ठांना देखील पंचारतीने ओवाळले जाते. त्यानंतर प्रत्येक घरातून प्रसाद घेतला जातो. विद्यार्थ्यांकडून ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या जातात. त्यानंतर ही प्रभातफेरी पुढच्या दाराजवळ थांबते. पुन्हा तशीच ओवाळणी आणि तशाच घोषणा देत ही प्रभातफेरी गावभर फिरते. घरोघरी फिरून स्वातंत्र्याचा जयघोष करते. येथील वयोवृद्ध नागरिक देवराव बगमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे सन १९५९ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू झाली. त्यावेळी तत्कालीन सरपंच गोविंदा बगमारे आणि पोलीस पाटील सीताराम वाढई यांनी राष्ट्रीय सणाला गावकºयांनी आपापल्या दारापुढे प्रभातफेरीची पूजा करावी असा निर्णय घेतला आणि गावात दवंडी देवून गावकºयांना अशा पद्धतीने राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन केले तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा अविरत सुरू आहे.
यावर्षीही त्याच परंपरेनुसार येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जाईल, असे सरपंच जगन हुकरे यांनी सांगितले. ही पंरपरा येथे अखंडपणे सुरू असताना ढोलसरवासीयांना आपण काहीतरी वेगळे करत असल्याचा मागमुसही नाही. राष्ट्रीय सणाला धार्मिक उत्सव आणि उत्साहाची जोड देऊन या गावाने अमिट ठसा उमटविला आहे. राष्ट्रभक्ती जोपासण्याचा संदेश पुढारी देतात. मात्र या गावकºयांकडून प्रत्यक्ष कृतीतून दिला जाणारा हा संदेश प्रशंसनीय असाच म्हणावा लागेल.