गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 09:43 PM2018-12-15T21:43:39+5:302018-12-15T21:44:19+5:30

ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे.

There the library is available in the school, the school there | गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय राबवा

गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय राबवा

Next
ठळक मुद्देधनंजय दलाल : भंडारा येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा विविध विषयांवरील व्याख्यानांनी समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी गाव तेथे वाचनालय, शाळा तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी केले.
भंडारा येथील जकातदार विद्यालयाच्या पटांगणावर आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी शंकर बळी, जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संभाजी पवार, साहित्य परिषदेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पाखमोडे, जकातदार विद्यालयाचे मुख्याध्यापक डि. आर. हटवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे उपस्थित होते.
वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाची चळवळ परत एकदा निर्माण करावी. शिक्षकांनी एकत्र बसून चर्चेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे दलाल यांनी सांगितले.
वाचाल तर वाचाल या उक्तीवर प्रकाश टाकतांना शंकर बळी म्हणाले की, ग्रंथ नसते तर मानव प्रगती करु शकला नसता तो मागासच राहिला असता. आधुनिक युगात ग्रंथाचे वाचन कमी झाले आहे. आपण टी.व्ही., इंटरनेटच्या कथेतील प्रसंग विसरुन जातो. परंतु ग्रंथातील प्रसंग आपल्या आजीवन स्मरणात राहते. म्हणून ग्रंथ व वाचनाची आवड स्वत:ला लावा, ग्रंथ हाच आपला प्रथम गुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
ग्रंथ हेच खरे मार्गदर्शक आहेत. अध्यात्मिक जीवनाची प्रगती ग्रंथामुळे होते. निरपेक्ष वाचनामुळे वाचकांना निरामय आनंद प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक गावात ग्रंथालय असावे, असे ग्रंथाची महत्ता सांगताना गुरुप्रसाद पाखमोडे म्हणाले. मोबाईल व इंटरनेटच्या वापरामुळे व्यक्ती ग्रंथालयात जात नाही. ग्रंथात जीवनाचा मौलीक साठा साठलेला आहे. ग्रंथाकडे वळा व त्याचा उपभोग घ्या. ग्रंथ वाचनाने ब्रम्हानंद मिळतो, हा आनंद उपमाहिन आहे. ग्रंथ चळवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीतलावर प्रभावी व्हायला पाहिजे. ग्रंथ आहे म्हणून मी आहे, ही भावना मनात असली पाहिजे. मानवी जीवनातील गाठ सोडविणारे पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे. वाचनविवेक प्रत्येकात असायला पाहिजे तरच आपली उन्नती होईल, असे ते म्हणाले. यावेळी संभाजी पवार मुख्याध्यापक डि.आर. हटवार यांचेही भाषण झाले.
१३ डिसेंबर पहिल्या दिवशी दुपारी १.३० ते ३ या दरम्यान पु.ल. देशपांडे - महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व या विषयावर परिसंवाद झाले. विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या सदस्या प्रा. शुभदा फडणवीस, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, मनोहरभाई पटेल महाविद्यालय, साकोलीचे प्रा. डॉ. राजेश दिपटे, राष्ट्रीय आदर्श विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय रामटेकचे प्रा. जगदिश गुजरकर या परिसंवादात सहभागी होते. दुपारी आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनवाने होते. तर प्रमोदकुमार आणेराव, सुरेश खोब्रागडे, प्रमोदकुमार साहु, अर्चना मोहनकर, डॉ. प्रभाकर लोंढे यांचा सहभाग लाभला.
१४ डिसेंबर दुसºया दिवशी ‘गांधी जीवन व विचार’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे यांचे व्याख्यान व्याख्यान झाले. दुपारी ‘स्वरगदिमा’ गदिमा यांच्या जन्मशताब्दी निमित्त अप्रतिम असा संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये सादरकर्ते आर.एम. पटेल महिला महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख प्रा. राहूल भोरे, डॉ. प्रा. श्वेता डी. वेगड, प्रा. रेखा ठाकरे, प्रा. महेश पोगळे यांनी भाग घेतला होता.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी केले. यावेळी ग्रंथालय पे्रमींनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: There the library is available in the school, the school there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.