पुजारीटोलातील पाण्यासाठी अद्याप डिमांड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:34 AM2021-05-24T04:34:02+5:302021-05-24T04:34:02+5:30

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ...

There is no demand for water in Pujaritola yet | पुजारीटोलातील पाण्यासाठी अद्याप डिमांड नाही

पुजारीटोलातील पाण्यासाठी अद्याप डिमांड नाही

Next

गोंदिया : उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. ही बाब लक्षात घेत मजीप्राने यंदाही पुजारीटोला प्रकल्पातील १० दलघमी पाण्याचे आरक्षण केले होते; मात्र मागील वर्षी चांगलाच पाऊस झाल्याने यंदाही मजीप्राला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणण्याची अद्याप तरी पाळी आलेली नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मागील वर्षाप्रमाणे पुजारीटोलाचे पाणी न घेताच निघून जाणार असल्याचे वाटते.

जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई जाणवत असून, पाण्यासाठी भटकंती सुरू होते.

अशात गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पंचाईत होते. गोंदिया शहराला मजीप्राच्या माध्यमातून डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाण्याचा पुरवठा होतो. कमी पाऊस झाल्यास नदी अटली तर त्याचा परिणाम गोंदिया शहरातील पाणीपुरवठ्यावर होतो.

यावर तोडगा म्हणून सन २०१७-१८ मध्ये गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असता, मजीप्राने पुजारीटोलाचे पाणी वैनगंगा नदीत सोडून शहरातील पाणीटंचाईवर तोडगा काढला होता.

त्यानंतर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न बघता मजीप्राकडून दरवर्षी पुजारीटोला प्रकल्पात पाण्याचे आरक्षण केले जाते. त्यानुसार यंदाही मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पात १० दलघमी पाण्याचे आरक्षण गोंदिया शहरासाठी करून घेतले आहे; मात्र मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे आतापर्यंत शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली दिसत नाही. म्हणूनच मजीप्राने पुजारीटोला प्रकल्पातील पाण्यासाठी बाघ-इटियाडोह पाटबंधारे विभागाकडे पाण्याची डिमांड दिली नसल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, आता मान्सून काही दिवसांवर आला असून, सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिली तर यंदाचा उन्हाळा असाच निघून जाणार व पुजारीटोलातील पाणी आणण्याची गरज पडणार नाही, असे बोलले जात आहे.

२०१८-१९ मध्ये आणले होते पाणी

गोंदिया शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने मजीप्राला सन २०१८ व २०१९ मध्ये पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. म्हणजेच सन २०१८ पासूनच या प्रयोगाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने सन २०२० मध्येही पाणी आणण्याची गरज पडली नव्हती, तर यंदा सध्यातरी तशी गरज दिसत नसल्याने यंदाही पाणी आणावे लागणार की नाही, हे काही दिवसांत समजणार आहे.

पुजारीटोला प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा

उन्हाळा आता आपल्या शेवटच्या टप्प्यात असून, येत्या ७ जूनपासून मान्सून सुरू होणार आहे; मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावून दिलासा दिला आहे. शिवाय, दररोजची स्थिती बघता कधीही पाऊस बरसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही यंदा पुजारीटोला प्रकल्पात ५०.६४ टक्के पाणीसाठा दिसत आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुजारीटोला प्रकल्पातून पाणी घेता येईल.

Web Title: There is no demand for water in Pujaritola yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.