जिल्ह्यात 974 शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसे आहे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 05:00 AM2021-07-10T05:00:00+5:302021-07-10T05:00:35+5:30
‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो. वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही.
राजू बांते
लाेकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : कोविड-१९ च्या प्रभावामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे असा आभासी दावा शालेय शिक्षण विभाग करीत आहे; पण जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ९७४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची बाब यू-डायस प्लसला दिसून आली आहे. मग विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे, असा प्रश्न समोर येत आहे.
‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो. वास्तव वेगळेच आहे. जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांकडून व्हाॅट्सॲप, झूम मीट व शिक्षण विभागाच्या दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविले जात आहे.
शिक्षकांच्या माेबाईलचा आधार
- शाळेत इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते. खरं तर काही बोटावर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर ऑनलाइन शिक्षण होत नाही, ही वास्तविकता आहे. दीक्षा ॲपमधील पीडीएफ व शाळा बंद शिक्षण सुरू ही माहिती इकडची तिकडे पाठविली जाते. यातून किती विद्यार्थी मोबाइल शिक्षण घेतात, हा प्रश्न आहे. यावर मात्र कुणाकडेही उत्तर नाही.
शिक्षकांना माेबाईलचा आधार
मोबाइलने आकृत्या, प्रतिकृती शिकविणे अवघड आहे. काठिण्यपूर्ण भाग शिकवूनही विद्यार्थ्यांना समजत नाही. अनेक शाळांत संगणक, प्रोजेक्टर असूनही धूळ खात आहेत. शासनाने इंटरनेटला सुविधा पुरविली पाहिजे.
- सुनीता तोडकर, मुख्याध्यापिका
स्व. पुष्पलताताई तोडकर विद्यालय, नरसिंगटोला
ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही. फेस टू फेस शिक्षण होत नाही. प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे अनुभवता येत नाही. त्यासाठी शाळेत विद्यार्थी आले पाहिजेत. अभासी अभ्यास विद्यार्थ्यांच्या फारसे लक्षात राहत नाही.
- राजेश निनावे, सहायक शिक्षक,
महात्मा ज्योतिबा फुले, धुसाळा
ऑनलाईन शिक्षण काय असते रे भऊ
ऑनलाइन मला माहीत नाही. गरीब असल्याने ना फोन ना टीव्ही. एक वर्षापासून शाळा बघितली नाही. आई-बाबा मजुरीला जातात. लहान बहिणीला सांभाळावे लागते. शाळा सुरू झाली पाहिजे. शाळा सुरू झाली नाही तर माझेच काय माझ्या सारख्या अनेकांचे शिक्षण थांबल्याशिवाय राहणार नाही.
- अनुज मारबदे, विद्यार्थी, मोहगाव देवी
घरी मोबाईलच मग ऑनलाईन शिक्षण कस होते हे थोडेच माहीत होणार. कुणाकडून किंवा शिक्षक घरी येतात. तूम्हाला हे करायच आहे. तेंव्हा अभ्यासाबाबत माहिती होते. शाळा सुरू झाली तरच आमचे अध्ययन प्रभावी होईल.”
- सेजल सार्वे, विद्यार्थीनी, कान्हळगाव