जिल्ह्यात ९७४ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:36+5:302021-07-10T04:24:36+5:30

मोहाडी- कोविड-१९ च्या प्रभावामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे असा आभासी दावा शालेय शिक्षण ...

There is no internet in 974 schools in the district, so how to start online education | जिल्ह्यात ९७४ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसे सुरू

जिल्ह्यात ९७४ शाळांत इंटरनेटच नाही, मग ऑनलाइन शिक्षण कसे सुरू

Next

मोहाडी- कोविड-१९ च्या प्रभावामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे असा आभासी दावा शालेय शिक्षण विभाग करीत आहे; पण भंडारा जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ९७४ शाळांमध्ये इंटरनेट सुविधाच नसल्याची बाब यू-डायस प्लसला दिसून आली आहे. मग विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कसे सुरू आहे, असा प्रश्न समोर येत आहे.

‘पाटी ते डिजिटल पाटी’ असा शिक्षणाचा प्रवास झाला आहे. त्यात अनेक मोठे बदल झाले. एक वर्षापासून शिक्षणाला तंत्रज्ञानाची, समाजमाध्यमांची जोड देण्याची सुरुवात झाली आहे. लहान मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेले दिसतात. तथापि, याचे चित्र गावखेड्यात कमी दिसून येत आहे.

‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांस शिक्षण दिले जात आहे; पण खेड्यापाड्यातील अनेक मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. ज्यांच्याकडे आहे त्यांना इंटरनेटचा खोडा आहे. हे जरी असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याचे शिक्षण विभाग सांगतो. वास्तव वेगळेच आहे. भंडारा जिल्ह्यातील १३२३ शाळांपैकी केवळ ३४९ शाळेत इंटरनेट सुविधा आहे, तसेच ९७४ शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे बऱ्याच शिक्षकांना व्हाॅट्सॲप, झूम मीट व शिक्षण विभागाच्या दीक्षा ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविले जात आहे, तसेच ऑनलाइन शिक्षणही हवे तसा परिणामकारक नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग खाजगीत सांगतात. जिल्ह्यात अनेक शाळांत आईसीटी प्रयोगशाळा आहेत. तिथेही इंटरनेटची सुविधा दिली गेली नाही. प्रशिक्षित शिक्षक काढून घेण्यात आले. त्यामुळे आईसीटी प्रयोगशाळा तशाच पडून आहेत. शाळेतील आईसीटी माध्यमाचा चांगला उपयोग करता आला तर अनेक समस्या मार्गी लागू शकतात.

1.इंटरनेट असलेल्या शाळा- ३४९

2. इंटरनेट नसलेल्या शाळा-९७४

3.जिल्ह्यातील एकूण शाळा -१३२४

4.शासकीय शाळा -८२३

5.अनुदानित शाळा - ३४३

6.विनाअनुदानित शाळा -३५७

शिक्षकांना मोबाइलचा आधार

शाळेत इंटरनेट सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या मोबाइलवरून ऑनलाइन शिक्षण द्यावे लागते. खरं तर काही बोटावर मोजण्याइतक्या शाळा सोडल्या तर ऑनलाइन शिक्षण होत नाही, ही वास्तविकता आहे. दीक्षा ॲपमधील पीडीएफ व शाळा बंद शिक्षण सुरू ही माहिती इकडची तिकडे पाठविली जाते. यातून किती विद्यार्थी मोबाइल शिक्षण घेतात, हा प्रश्न आहे.

मास्तर पोरं बेंड झाली

मास्तर शाळा बंद असल्याने आमची पोरं बिघडली. काही ऐकत नाहीत. आम्ही शेतावर जातो. घरी मुले मोबाइलवर काय बघतात त्यांनाच माहीत. नुसते हिंडत-फिरत असतात. त्यांच्यासाठी शाळा सुरू असलेली बरी. मास्तर, पोरं बेंड झाली अशी प्रतिक्रिया खेड्यातील पालकांची आहे.

कोट

जिल्ह्यातील अनेक शाळांत इंटरनेट नाही हे वास्तव आहे. ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या उपक्रमाने शिक्षक तंत्रस्नेही बनले आहे. शिक्षक प्रामाणिकपणे विविध प्रयोग व उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण देत आहेत.

मनोहर बारस्कर

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जिल्हा परिषद, भंडारा

मोबाइलने आकृत्या, प्रतिकृती शिकविणे अवघड आहे. काठिण्यपूर्ण भाग शिकवूनही विद्यार्थ्यांना समजत नाही. अनेक शाळांत संगणक, प्रोजेक्टर असूनही धूळ खात आहेत. शासनाने इंटरनेटला सुविधा पुरविली पाहिजे.

सुनीता तोडकर

मुख्याध्यापिका

स्व. पुष्पलताताई तोडकर विद्यालय, नरसिंगटोला

ऑनलाइन शिक्षण प्रभावी नाही. फेस टू फेस शिक्षण होत नाही. प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रभावीपणे अनुभवता येत नाही. त्यासाठी शाळेत विद्यार्थी आले पाहिजेत.

राजेश निनावे

सहायक शिक्षक, म. ज्यो. फुले धुसाळा

ऑनलाइन मला माहीत नाही. गरीब असल्याने ना फोन ना टीव्ही. एक वर्षापासून शाळा बघितली नाही. आई-बाबा मजुरीला जातात. लहान बहिणीला सांभाळावे लागते. शाळा सुरू झाली पाहिजे.

अनुज मारबदे

विद्यार्थी, मोहगाव देवी

विद्यार्थी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहगाव देवी

घरी मोबाईलच मग ऑनलाईन शिक्षण कस होते हे थोडेच माहीत होणार. कुणाकडून किंवा शिक्षक घरी येतात. तूम्हाला हे करायच आहे. तेंव्हा अभ्यासाबाबत माहिती होते. शाळा सुरू झाली तरच आमचे अध्ययन प्रभावी होईल."

सेजल सार्वे

विद्यार्थीनी, कान्हळगाव

Web Title: There is no internet in 974 schools in the district, so how to start online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.