विदर्भाशिवाय पर्याय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 12:22 AM2016-05-13T00:22:24+5:302016-05-13T00:22:24+5:30
मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक
राजकुमार तिरपुडे : -तर हिंदी भाषिकांचे एकच राज्य करा
भंडारा : मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्राची उपराजधानी अशी आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा तुलनात्मक अभ्यास केल्यास महाराष्ट्र राज्याचा प्रयोग सपशेल अपयशी ठरला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दैनंदिन विकास होत असताना नागपूर कराराकडे परस्पर दुर्लक्ष झाल्याने विविध क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला. आजघडीला १.५० लाख कोटीच्या घरात असून कधीही भरून येणे शक्य नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाशिवाय पर्याय नसल्याचे मत विदर्भ राज्याचे समर्थक राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
या संपूर्ण काळात जागृत विदर्भीय नेत्यांनी या प्रादेशिक अन्यायाविरूद्ध आवाज उठविला. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी जोर धरू लागली. अनुशेष भरून देत नसाल तर विदर्भ राज्य वेगळे देण्याची मागणी करण्यात आली व वैदर्भीय जनतेने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमिवर वैदर्भीय जनतेत विदर्भावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाबद्दल असंतोष आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात विदर्भ शासनाकडून होणाऱ्या उपेक्षेमुळे पिछाडीवर आहे. शेतकरी आत्महत्या ही विदर्भातील विशेष ज्वलंत समस्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
१९ मे विदर्भ राज्य संकल्प दिवस पाळा
१९ मे हा दिवस विदर्भवादी जनतेतर्फे संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य संकल्प दिवस म्हणून पाळला जातो. स्वतंत्र विदर्भाचे खंदे पुरस्कर्ते व महाराष्ट्राचे प्रथम उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृतीदिवसाचे औचित्य साधून विदर्भवादी उत्स्फूर्तपणे हा दिवस साजरा करतात. यंदाही याप्रसंगी विदर्भातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील जनतेने ‘माझा विदर्भ हा नैसर्गिक संपत्ती तसेच विविधतेने परिपूर्ण असूनही हवी असलेली संपन्नता विदर्भाच्या वाट्याला आलेली नाही. आम्हाला विश्वास वाटतो की विदर्भराज्य वेगळे झाल्यास आमच्या विदर्भाची प्रगती होवून संपन्नता येईल. विदर्भ राज्य मिळविण्याचा मी संकल्प करतो’. अशी शपथ घेण्याचे आवाहनही राजकुमार तिरपुडे यांनी केली.