अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही...
By admin | Published: May 30, 2016 12:56 AM2016-05-30T00:56:36+5:302016-05-30T00:56:36+5:30
जीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते.
मृत्यूनंतरही थट्टा : मोहाडी तालुक्यात ३६ गावात स्मशानशेड नाही, ६४ गावांच्या स्मशानभूमीत पाण्याची सोय नाही
राजू बांते मोहाडी
जीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते. नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावा लागतो. संपूर्ण आयुष्य सुखात व स्वत:च्या शरीराला जपणारा हा व्यक्ती अग्नीत लोप पावतो. तथापि या निर्जीव देहाला काही काळ तरी मायेची सावली मिळावी ही किमान अपेक्षा नातलगांची असते. पण मोहाडी तालुक्यातील ३६ गावात स्मशान शेड नसल्याने मृतात्मा तपत्या सुर्यात/ पाण्यापावसात जाळावा लागतो.
मृत्यूनंतर मुखाग्नी दिली जाते. पण मृत्यूपर्व सुखात राहणारा मनुष्य प्राणी विविध स्तरावर संघर्ष करीत असतो, ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना गरीब, श्रीमंत आपल्यापरीने करीत असतो. जिवंतपणी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी निवारा म्हणून घर असतो. घरात पंखा, कुलर लावला जातो, पावसाच्या बचावासाठी रेनकोट छत्र्यांचा वापर केला जातो. अशाप्रकारे स्वत:ला जपत असतो. स्वत:ला जपणारे शरीर एक दिवस परलोकी जातो. देहलोकी शरीरावर अंतिम संस्कार केला जातो. तत्पूर्वी त्याच्या पार्थिवाला सावली दिली जाते. अग्नीस्थानी चिता ठेवली जाते तेव्हा मायेची सावली दूर केली जाते. त्यानंतर जळणाऱ्या देहाला वरच्या मायेच्या सावलीचे पांघरुन असावे यासाठी शासनातर्फे श्मशासन शेड निर्माण केले जाते. तथापि, अंतिम संस्कारातही त्या मृत्युरुपी शरीराला ३६ गावात मायेची सावली मिळत नसल्याचे दिसून आले आहे.
अंतिम संस्कार करण्यासाठी धर्मापुरी, भोसा, चिचोली, देवूळगाव, बिटेखारी, नरसिंहटोला, देव्हाडा बू. ढिवरवाडा, किसनपूर, कान्हळगाव, मुंढरी, काटे बाम्हणी, लेंडेझरी, केसलवाडा, डोंगरदेव, बोंडे, मोरगाव, महालगाव, मालिदा, बोटेश्वर, जांभळपाणी, दवडीपार, मुंढरी खू. निलज बू., निलज खू., पालडोंगरी, पांढराबोडी, बोरी, पिंपळगाव चोरखमारी, सकरला, नेरला, सितेपार झं., शिवनी, ताडगाव, सिहरी फुटाळा निवारा तयार केला गेला नाही. तसेच महसूल विभागाकडे श्मशानभूमीची नोंद नाही, अशी अकरा गाव आहेत. मोरगाव, वासेरा, ताडगाव, मुंढरी खू., मलीदा, जांभोरा, किसनपूर या गावाचा समावेश आहे. या गावात प्रेत पुरण्यासाठी गावात जमीन नाही. ज्या गावात जन्माची नाळ गाडली जाते. त्याच भूमित आपली अंतीम संस्कार व्हावा, अशी अनेकाचंी इच्छा असते. पण, गावच्याच मातीत अंतीम संस्कार करण्यासाठी गावची भूमि मिळत नाही ही चिंतेची बाब आहे.
गाव तिथे अंतिम संस्कार निवारा असावा. मातीत संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी असावी, असे असताना स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षीही अंतिम संस्काराच्या सोयी सुविधा करण्यास प्रशासन दूर राहिला आहे.
६४ गावात श्मशानभूमीवर हातपंपाची सोय नाही. उन्हाळ्यात नाले, नद्या कोरड्याठक पडतात. त्यावेळी स्मशानघाटावर हातपंप असले तर अंतीम संस्काराचे सुतक करण्यासाठी पाण्याचा वापर होईल. तसेच अंतीम संस्कारासाठी जमलेल्या आप्तमंडळींना कोरडे घसे ओले करता येतील.
स्मशानभूमीवर ना श्मशानशेड ना पाण्याची सोय करण्यासाठी कोणत्याच शासनाने आवश्यक पावले उचलली नाही. मृतात्मा जाळतानाही दु:ख अन् त्यांच्या परिवारालाही वेदना देण्याचं काम शासन करीत आहे..
डबक्यातील पाण्याने अग्निसंस्कार
अंतिम संस्कारासाठी पाणी महत्त्वाचे असते. पण ६४ गावात स्मशानघाटावर पाण्याची व्यवस्था नाही. अग्निदाह करण्यापूर्वी मुखाग्नी देणारे नातलग पाण्याने ओले होतात. मगच शवाला मुखाग्नी देण्याची रित पार पाडतात. मुखाग्नी देण्याचा संस्कार करण्यापूर्वी पाणी घरुन तर काहींना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. काही तर डबक्यातील साचलेलं पाणी अंगावर शिंपडून अग्नी संस्कार करतात.