नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण नाही
By admin | Published: February 1, 2015 10:50 PM2015-02-01T22:50:11+5:302015-02-01T22:50:11+5:30
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकसानीचा गेला. त्यामुळे उन्हाळी धानपिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली.
संजय साठवणे - साकोली
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम नुकसानीचा गेला. त्यामुळे उन्हाळी धानपिकावर शेतकऱ्यांची आशा होती. मात्र यावर्षीच्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना दुबार-तीबार पेरणी करावी लागली. मात्र झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षणच झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईच मिळणार नाही.
दुबार-तिबार पेरणीमुळे उन्हाळी धानपिकाच्या रोवणीला यावर्षी उशीर झाला. त्यामुळे उन्हाळी धान पिकाच्या उत्पादनावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली. तरी अजुनही रोवणी झाली नाही. जसाजसा रोवणीला उशीर होईल. तसतसा पाण्याचे संकट ओठवणार आहे. म्हणजेच दरवर्षी होणाऱ्या सरासरी उत्पन्नात यावर्षी मोठी घट होणार आले. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना खरीप, रब्बी व उन्हाळी धानपिक याचा मिळणाऱ्या उत्पन्नात नुकसानच होणार आहे.
यावर्षी पावसाळ्यात पावसाने दगा दिल्यानंतर शेतकरी पुरता हवालदिल झाला होता. तर हिवाळ्यात थंडीने कहर केला. पारा ६ अंश सेल्सीअस पेक्षा कमीवर गेला. मात्र तीच परिस्थिती उद्भवल्याने शेवटी शेतकऱ्यांनी कृषि विभागाची मदत घेतली. तेव्हा खरे कारण समोर आले. मात्र यावर कृषि विभागही पर्यायी सोय करु शकले नाही. विभागामार्फत शेतकऱ्यांना पऱ्हे वाचविण्यासाठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले असले तरी कृषि विभागाचे हे कंटाळून शेळ्या हाकण्याचा प्रकार दिसून येत होता. एवढे होवूनही या नुकसानीची साधी दखल घेण्यात आली नाही.