घरासमोर साचले गुढघाभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:39 AM2021-09-21T04:39:02+5:302021-09-21T04:39:02+5:30
२० लोक ०९ के भंडारा: हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज नोंदविला असून सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात ...
२० लोक ०९ के
भंडारा: हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज नोंदविला असून सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १९ सप्टेंबरच्या मध्य रात्रीपासून तालुक्यातील संगम पुनर्वसन मुजबी येथे जोरदार पाऊस पडला असून गावातील गटारे तुडुंब भरून लोकांच्या घरासमोर नाल्याच्या पाण्याचे अक्षरशः पूर आल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत भोंगळ कारभार प्रश्न उपस्थित केले आहे. घरासमोर गुढघाभर पाणी साचले आहे.
मागील पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यावासीयांना झोडपले आहे. तालुक्यातील संगम पुनर्वसन मुजबी येथे मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने मेघ गर्जनेसह हजेरी लावली. त्यामुळे संगम येथील निकृष्टदर्जाच्या नाल्याची पोलखोल झाली असून गावातील अरुंद तसेच बंद असलेली गटारे तुडुंब भरली आणि शैलेश मेश्राम यांच्या घराला गटाराच्या पाण्याने वेढले असून घरासमोर चक्क नालीच्या पाण्याचे पूर आले.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावातील गटारे स्वच्छ करणे ग्रामपंचायतचे काम होते. मात्र दरवर्षी नाल्याचे बांधकाम व नाली दुरुस्तीवर हजारो रुपयाचे अंदाजपत्रक तयार करून कागदावरच पैशांची उधळपट्टी केली जाते. मात्र नाल्यासफाईची कामे, सांडपाणी किंवा पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे गावातील नागरिकांच्या घरासमोर गटाराचे पाणी साचले जात असल्याचे संगम येथील संगम येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या निमित्ताने पुन्हा एकदा ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे आतातरी ग्रामपंचायत याकडे लक्ष देईल काय? असा नागरिकांचा सवाल आहे.