लबाडी आली अंगलट

By Admin | Published: November 8, 2016 12:32 AM2016-11-08T00:32:11+5:302016-11-08T00:32:11+5:30

विधान परिषद निवडणूक आणि घोडेबाजार हे सर्वश्रुत समिकरण असते. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुण्याची संधी कुणी सोडत नाही.

There was a trick on the cheat | लबाडी आली अंगलट

लबाडी आली अंगलट

googlenewsNext

विधान परिषद निवडणूक : दुसऱ्याच्या बायकोला समोर करून घेतले ‘टोकन’
भंडारा : विधान परिषद निवडणूक आणि घोडेबाजार हे सर्वश्रुत समिकरण असते. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुण्याची संधी कुणी सोडत नाही. यापूर्वी अनेकवेळा अशी संधी साधता आल्यामुळे काही महाभाग संधीच्या शोधात राहतात. यापूर्वीच्या निवडणुकांत फावले असले तरी या निवडणुकीत मात्र हा प्रकार एकाच्या चांगलाच अंगलट आला आहे.
भंडारा - गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षात होणार आहे. दिवाळी आटोपताच स्वपक्षाच्या मतदारांसह मिळेल त्या मतदारांना (देवदर्शनासाठी) उचलण्यात येत आहे. यात सर्वच पक्षांकडून स्वपक्षातील मतदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. परंतु काही पक्षातील मतदार अजूनही गावात असल्यामुळे त्यांच्यावर सर्वच राजकीय पक्षांची नजर आहे.
दरम्यान, तुमसर तालुक्यातील मतदार असलेली महिला जिल्हा परिषद सदस्य पतीसोबत चार दिवसांपूर्वी १० वाजून १० मिनिटांनी भारतभ्रमणावर गेली. ही महिला मतदार भ्रमंतीवर गेल्याचे कळताच ‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्यामधील एका महाभागाने तिसऱ्या व्यक्तीला समोर करून दुसऱ्याच्या बायकोला मतदार असल्याचे सांगून आपल्याच पक्षातील उमेदवाराकडून ‘टोकन’ म्हणून काही रक्कम उकळली. त्यानंतर दुसऱ्या पक्षातील एक मतदार गळाला लागला, असे अविर्भावात सांगत ‘टोकन’ स्वत:जवळ ठेऊन घेतली.
हा सर्व प्रकार गुरूवारला दिवसभराच्या घडामोडीत पार पडला. त्यानंतर नवीन मतदारांची गोळाबेरीज उमेदवाराच्या निकटवर्तीयाला रात्री उशिरा कळली. त्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्याने मतदारयादीत वाढीव ‘एक’ची नोंद करीत असताना त्याचा या नावावर संशय बळावला. हा मतदार दुसऱ्या पक्षाचा असून तो आधीच फिरायला बाहेर गेल्याचे माहित असल्यामुळे हा मतदार सापडला कसा? अशी शंका निर्माण झाली. शंकेचे निरसन करण्यासाठी सोबतच्या कार्यकर्त्याने त्या जिल्हा परिषद सदस्य महिलेच्या पतीशी रात्री १२ वाजताच संपर्क साधला.
हॅलो... भाऊ कुठे आहेस, असे विचारताच, मी व वहिणी बाहेरगावी आहे, असे सांगितल्यानंतर फोन बंद केला. या वार्तालापानंतर उमेदवाराचे निकटवर्तीय व त्या कार्यकर्त्याने या घडामोडीमागील ‘सुत्रधार’ असलेल्या व्यक्तीच्या घरी रात्रीच धडक दिली. झोपेतून त्यांना उठविण्यात आले. ‘आज तुम्ही आम्हाला दिलेला तो मतदार नको, त्याच्यासाठी दिलेले ‘टोकन’ परत द्या’, असा प्रश्न समोरच्या मंडळीने केला. त्यावर ‘टोकन’ ज्यांनी घेतले त्यांच्याकडे असल्याचे त्या महाशयाने सांगितले. त्यानंतर त्यांचे वाहन मोहगावच्या दिशेने निघाले.
रात्रीच त्या इसमाचे घर गाठले. झोपेतून जागा झालेल्या त्या इसमाची समोरच्यांना बघताच दातखिळी बसली. भांबावलेल्या त्या इसमाने बनवाबनवीच्या या प्रकाराची कबुली दिली. त्यानंतर ‘टोकन’ परत घेण्यात आले. आणि या प्रकरणातील बिंग फुटले. दोन दिवस कानोकानी नसलेली ही खबर रविवारला दबक्या आवाजात सुरू झाली. आणि या घटनेमागील ‘सूत्रधाराचे’ किस्से रंगू लागले... (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: There was a trick on the cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.