केसलवाडा येथे स्वतंत्र कोविड रुग्णालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:35 AM2021-05-10T04:35:25+5:302021-05-10T04:35:25+5:30
लाखनी : कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. गंभीर अवस्थेतील ...
लाखनी :
कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय आणि खासगी रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी पैसे खर्च करण्याची तयारी असतानाही ऑक्सिजन बेडही मिळत नाहीत. आता तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी केसलवाडा येथे ऑक्सिजन बेडने युक्त स्वतंत्र कोविड रुग्णालय होणार आहे.
केसलवाडा (वाघ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची यासाठी निवड करण्यात आली आहे. याच परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्लांट तयार करण्यात येणार असून कामाला सुरुवात झाली आहे. तालुक्यातच उपचाराची सोय व्हावी याकरिता आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य विभागाच्या वतीने हे रुग्णालय स्थापन करण्यात येत असल्याची माहिती तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा तहसीलदार मलिक विराणी, समन्वयक नरेश नवखरे यांनी दिली.
शासनाच्या वतीने १०० खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालयाची संकल्पना राबविण्यात आली असून नव्याने तयार होणारे हे कोविड रुग्णालय अत्याधुनिक सर्व सोयी- सुविधायुक्त राहणार आहे. त्यामध्ये सर्व ७५ खाटांसाठी ऑक्सिजन व अतिरिक्त ऑक्सिजनची व्यवस्था असेल. जवळपास १०० खाटांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या रुग्णालयाला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम, उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उइके, तहसीलदार मलिक विराणी, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, तालुका आपत्ती व्यवस्थापनाचे समन्वयक नरेश नवखरे यांनी भेट दिली असून ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे शुक्रवारी काँक्रिटीकरण करण्यात आले. येत्या काही दिवसांत हे रुग्णालय नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे. त्यासाठी रात्रंदिवस युद्धस्तरावर काम सुरू आहे.