‘त्यांनी’ झाडे लावली आणि जगवलीसुद्धा
By admin | Published: July 6, 2016 12:38 AM2016-07-06T00:38:27+5:302016-07-06T00:38:27+5:30
झाडे लावणे ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांना जगविणे कठीण झाले असून वृक्षारोपणानंतर झाडे जगविले नाही असा बहुतांश अनुभव आहे.
निष्टी येथील आदर्श : ६०० झाडांची बहारदार रोपवाटिका
भुयार : झाडे लावणे ही आता फॅशन झाली आहे. पण त्यांना जगविणे कठीण झाले असून वृक्षारोपणानंतर झाडे जगविले नाही असा बहुतांश अनुभव आहे. पण त्यांनी कोणताही वाजागाजा न करता झाडे लावली आणि ती जगवली सुद्धा आहेत.
पवनी तालुक्यात येत असलेल्या व येथून जवळच असलेल्या निष्टी येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येत असलेल्या कृषी तंत्रनिकेतन शाळेतील शिक्षकांनी ही करामत केली आहे. विविध जातीची अंदाजे ५०० ते ६०० झाडे लावली. ही झाडे लावण्यासाठी त्यांना कोणी आग्रह केला नाही. स्वयंस्फूर्तीने ते पुढे आले आणि वृक्षारोपण केले. अनेक वर्षे ते वृक्षारोपण करूनच ते मोकळे झाले नाही तर लावलेली झाडे जगविण्याचा त्यांनी निर्धार केला. ही वृक्ष लागवड पावसाळ्यात करण्यात आल्याने पावसाळ्यात त्यांना या झाडांना पाणी घालण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. मात्र शाळांना सुट्या लागल्यानंतर उन्हाळ्यात या झाडांना जगवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला. यावर शिक्षकांनी विचारविनिमय करून या झाडांना पाणी घालण्यासाठी महिलांना मजुरीने पाण्यावर ठेवले. त्या महिलांनीही झाडाची निगा राखत झाडांना पाणी दिले.
आज ही झाडे डौलदार झाली आहेत. शाळेचा परिसर हिरवागार दिसत असून आजही झाडे डोलाने मिरवित आहेत. विद्यालयाचे कृषी सहाय्यक विठ्ठल ठाकरे, कृषी सहाय्यक किशोर पालांदूरकर, प्रा.बाळू फुलबांधे, शालीक पवार, भाकरू जुगनाके व विद्यालयाची संपूर्ण चमू निगा राखत आहेत. वृक्ष जगविल्याने त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)
शाळेतील शिक्षकांनी झाडांची उत्तम निगा राखली, म्हणूनच ही झाडे जगली. प्रत्येकांनी आपली जबाबदारी समजून आपले कर्तव्य पार पाडले तर नक्कीच नंदनवन फुलेल.
प्रा.बाळू फुलबांधे,
कृषी सहाय्यक,
कृषी तंत्रनिकेतन विद्यालय, निष्टी.