जीव मुठीत धरून 'त्यांनी' रात्री जागून काढल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:55 AM2024-09-14T11:55:29+5:302024-09-14T11:56:03+5:30

भंडारात ६० इमारती जीर्ण : अतिवृष्टीने वाढली अनेकांची धडकी

"They" spent the night awake with their lives in their hands... | जीव मुठीत धरून 'त्यांनी' रात्री जागून काढल्या...

"They" spent the night awake with their lives in their hands...

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
शहरात जीर्ण इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. नागरिक जीर्ण इमारतींतून स्वतःहून बाहेर निघत नाहीत तर दुसरीकडे प्रशासन कारवाईची नोटीस बजावून दिवस ढकलत आहे. पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना जिल्ह्यात घडत असतात. सतर्कता न बाळगल्यास जीवित व वित्तहानी होते. पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा मुद्दा दरवर्षीच चर्चेत असतो; मात्र, त्यावर ठोस उपाययोजना भंडारा नगरपालिकेकडून होत नाही.


भंडारा शहरात ५० ते ६० वर्षे व त्यापेक्षाही जुन्या इमारती आजही बजरंग चौक, हेडगेवार चौक, मोठा बाजार मेन रोड परिसरात दिसून येत आहेत. या इमारतींमध्ये वास्तव्यासह दुकाने थाटली आहेत. मोडकळीस आलेल्या इमारतींचा वापर न करण्याबाबत प्रशासनाकडून बजावले जाते; परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. भंडारा शहरात जुन्या वस्तीत एका बाजूला एक अशा खेटून इमारती उभ्या आहेत. त्यामुळे एखाद्या जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्यास आजूबाजूच्या रहिवाशांच्या जिवालादेखील धोका पोहोचण्याची भीती असते. पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासन अतिधोकादायक, धोकादायक इमारतींना नोटीस पाठवते. परंतु, या नोटिसांकडे दुर्लक्ष करून त्यात वास्तव्य केले जात असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसून येत आहे.


शासकीय इमारती, निवासस्थाने जीर्ण 
शहरात शासकीय कार्यालयांच्या व वसाहतींच्या अनेक इमारती जीर्ण झालेल्या आहेत. काही इमारती सिमेंट व लोखंडी पत्र्याच्या आहेत. शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने शासकीय वसाहती व कार्यालयीन इमारती जैसे थे स्थितीत उभ्या आहेत.


शहरात धोकादायक ६० इमारती 
भंडारा शहरात जवळपास ६० इमारती जीर्ण असून, धोकादायक स्थितीत आहेत. या इमारत मालकांना स्थानिक प्रशासनाने नोटिसा बजावलेल्या आहेत. या इमारतीमध्ये बरीच कुटुंबे वास्तव्यास आहेत. तर काहींचे व्यवसाय सुरू आहेत. काही इमारतींत शिकवणी वर्ग तर काही इमारती कार्यालयीन कामासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे.


पालिकेने पाठविल्या ४० नोटीस 
शहरातील ४० जीर्ण इमारत मालकांना स्थानिक प्रशासनाने नोटीस बजावलेली आहे. ही नोटीस प्राप्त होऊनसुद्धा एकानेही घर सोडलेले नाही. दुसरीकडे राहण्याची व्यवस्था नाही. उत्पन्नाचे फारसे साधन नाही, त्यामुळे जावे तरी कुठे, असा प्रश्न अनेकांकडून प्रशासनास विचारला जात आहे.


अनेकांसमोर निवासाचा प्रश्न 
शहरातील जीर्ण इमारतींमध्ये जवळपास १५० नागरिक वास्तव्य करीत आहेत. अनेकांना राहण्यासाठी दुसरे घर नाही, प्रशासन निवारा देण्यास असमर्थ आहे. काहींची घरकुलाची मागणी आहे. काहींमध्ये मोठ्या प्रमाणात आपापसांत वादविवाद आहेत. त्यामुळे इथून जावे तरी कोठे, असा प्रश्न अनेकांसमोर आहे. इमारतीतून जागा सोडल्यास निवासाचा प्रश्न उभा राहू शकतो.
 

Web Title: "They" spent the night awake with their lives in their hands...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.