रेतीची चोरी पकडायला गेले अन् गिट्टीचे ट्रक घेऊन आले..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 10:41 AM2022-05-06T10:41:16+5:302022-05-06T10:49:18+5:30
नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास तालुका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी रेती चोरटे आणि माफियांच्या विरोधात कारवाईसाठी धाव घेतली आहे.
चुल्हाड (सिहोरा ) : जिल्ह्यात रेती चोरीच्या विरोधात महसूल विभाग आणि पोलीस विभागाने कंबर कसल्याचे दिसून येतात. रेती माफियाचे धाबे दणाणले आहेत. नद्यांच्या खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास तालुका प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी रेती चोरटे आणि माफियांच्या विरोधात कारवाईसाठी धाव घेतली आहे. परंतु रेती चोरटे गवसले नाहीत, गिट्टीचे ट्रक ताब्यात घेतले आहे. रेती चोरट्यांचा जबरदस्त नेटवर्क असल्याने जाळ्यात अडकले नाहीत.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात वैनगंगा आणि बावणथडी नद्यांचे खोरे आहेत. वैनगंगा नदीत पाणी अडविण्यात आल्याने रेतीची चोरी बंद झाली आहे. परंतु याच नदीवरील तामसवाडी, पांजरा घाटातून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. दरम्यान बावणथडी नदीच्या पात्रात मध्यप्रदेशातील रेती माफियांनी शिरकाव केल्याने पात्रच पोखरून काढले आहेत. नदीच्या पात्रात तालुका प्रशासनाने सीमांकन केले नसल्याने मध्यप्रदेशातील रेती माफिया महाराष्ट्राच्या हद्दीत रेतीचा उपसा करीत आहेत.
मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर विदर्भात रेतीची विक्री करण्यात येत आहे. या रेती माफियाच्या विरोधात कधी कारवाई झाली नाही. महालगावच्या घाटावरून रोज रात्री ६० ते ७० ट्रॅक्टर मधून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. गावकरी मात्र हैराण झाले आहेत. वरपिंडकेपार गावाच्या हद्दीत असणाऱ्या पात्रातून रेतीचा बेधडक उपसा करण्यात आल्याने पात्रात रेतीच नसल्याचा अनुभव गावकऱ्यांना आलेला आहे.
जबरदस्त नेटवर्कचे काम
रेती चोरट्याचे परिसरात जबरदस्त नेटवर्क आहे. १० किमी अंतरावरून त्यांचे एजंट अधिकाऱ्याचे वाहनांची इत`थंभूत माहिती फोनवरून देत आहेत. ट्रॅक्टर मालक मध्यरात्रीपासून पहारा देत आहेत. महाराष्ट्र शासन असे नमूद असणारे वाहन दिसताच नदी पात्रातील वाहने पळवून लावले जात आहेत. यामुळे रेतीचे चोरटे पथकाला गवसले नाहीत.