मी चोर आहे, तुम्हाला मारून टाकीन, असे म्हणत चोरटा गेला पळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 03:28 PM2022-01-18T15:28:35+5:302022-01-18T15:53:41+5:30
कोंबडी चोरण्यासाठी आलेल्या चोराने चाकूच्या धाकावर नागरिकांना धमकावले व संधीचा फायदा घेत पळून गेला.
भंडारा : मी चोर आहे. माझ्या फंदात पडू नका, मी तुम्हाला मारून टाकेन, असे चाकूच्या धाकावर पकडणाऱ्यांना धमकावत चोरट्याने पळ काढला. साकोली नजीकच्या सेंदुरवाफा येथे कोंबडी चोरण्यासाठी आलेल्या चोराचा हा थरार सोमवारी अनेकांनी अनुभवला.
सेंदुरवाफा येथील गजानन बाबा मंदिराजवळ नागनाथ गणपत बोरकर यांचे घर आहे. रविवारी ते पत्नीसोबत बाजारात गेले होते. घरी आले तर एक इसम त्यांच्या घरातील दोन कोंबडे घेवून जाताना दिसला. त्याला कोणाचे कोंबडे आहेत, असे विचारले तेव्हा माझेच कोंबडे होय, असे उत्तर दिले. मात्र नागनाथच्या पत्नीने ते आपलेच कोंबडे आहे, असे सांगितले. त्याला पकडण्यासाठी नागनाथ धावला. मात्र चोरटा पळू लागला.
नागनाथने चोर चोर असे ओरडल्याने परिसरातील नागरिकही धावून आले. त्याचवेळी चोरट्याने आपल्या हातातील कोंबडे फेकून खिश्यातून एक लहान चाकू काढला. पकडणाऱ्यांना धमकावत मी चोर आहे, माझे नाव राजेश गायकवाड आहे. तुम्हाला मारून टाकीन, असे म्हणत होता. त्याच्या हातातील चाकू पाहून पकडणारे नागरिकही थबकले. याच संधीचा फायदा घेत पळून गेला. नंतर चोरट्याचा शोध घेतला असता कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून राजेश गायकवाड (३३) रा. गडचिरोली याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
कोंबडी चोराची गावात चर्चा
कोंबडी चोरण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या या हिम्मतबाज चोरट्याचीच सध्या सेंदुरवाफात चर्चा आहे. घरमालकाच्या सतर्कतेने कोंबडे चोरता आले नाही. मात्र चाकूच्या धाकावर पसार होता आले आहे. कोंबडे गेले मात्र आपण बचावलो, असेच चोरटा म्हणत असावा.