एसटीतून पाच लाखांचे दागिने पळविणारा चोरटा जेरबंद; एलसीबीची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 04:36 PM2022-10-21T16:36:17+5:302022-10-21T16:38:51+5:30
सहा महिन्यांपूर्वी उडविली होती बॅग
भंडारा : एसटी प्रवासातून ५ लाख ३८ हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग पळविणाऱ्या उत्तर प्रदेशातील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. तुमसर ते नागपूर प्रवासादरम्यान २० मे रोजी बॅग पळविण्याची घटना घडली होती. तेव्हापासून पोलीस चोरट्याच्या मागावर होते.
नईम शौकत अली (२३) रा. मेहंदीपूर, ता. मिलक, जिल्हा, रामपूर (उत्तर प्रदेश) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याजवळून रोख १० हजार आणि मोबाइल जप्त करण्यात आला. तुमसर येथील गोवर्धन नगरातील नंदलाल धोंडबा बिल्लोरे (६१) आपल्या पत्नीसह २० मे रोजी तुमसरवरून नागपूरकडे एसटी बसने जात होते. बसच्या रॅकमध्ये ठेवलेली त्यांची बॅग ५ ते ७ अज्ञात इसमांनी हातचलाखीने खाली पाडून कव्हर कापून बॅगमधील स्टीलच्या डब्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. याप्रकरणी वरठी ठाण्यात २२ मे रोजी तक्रार देण्यात आली.
पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या नेतृत्त्वात एक पथक तयार करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार, अभिजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, पोलीस नायक प्रफुल्ल कठाणे, अंकुश पुराम, राज कापगते यांनी तपास सुरू केला. तांत्रिक बाबीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविली. उत्तर प्रदेशातील मेहंदीपूर गाव गाठून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन वरठी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
हत्यारबंद पोलिसांच्या मदतीने घेतले ताब्यात
उत्तर प्रदेशातील मेहंदीपूर येथे भंडारा पोलीस पोहचले. माहिती काढण्यात आली. त्यावेळी नईम अली राहत असलेला परिसर संवेदनशील असल्याचे पुढे आले. पोलिसांनी स्थानिक हत्यारबंद पोलिसांची मदत मागविली. त्यांच्या मदतीने नईमला ताब्यात घेतले. त्याने चोरी केलेला माल राकेश शालीकराम वर्मा रा. जलालपुरा बिल्लारी जिल्हा मुरादाबाद याला विकल्याचे सांगितले.