देवदर्शनाला जाणे पडले महागात, घरी तीन लाख २६ हजारांची चोरी; सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 05:39 PM2022-12-03T17:39:33+5:302022-12-03T17:42:08+5:30
तुमसरच्या गोवर्धन नगरातील घटना
तुमसर (भंडारा) : देवदर्शनासाठी जाणे एका परिवाराला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचांदीचे तीन लाख २६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना तुमसर शहरातील गोवर्धननगरात उघडकीस आली. तुमसर ठाण्यात गुरुवारी तक्रार देण्यात आली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. हरदोली येथे चाकूच्या धाकावर चोरी होण्याच्या पाठोपाठ तुमसर शहरात चोरी झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुमसर येथील गोवर्धननगरात विक्की हेमंत जयस्वाल यांचे घर आहे. बुधवारी कुटुंबासह माडगी येथील नृसिंह मंदिरात देवदर्शनासाठी होते. घरी कोणी नाही याच्या फायदा चोरट्यांनी घेतला. चोरट्यांनी स्वयंपाकगृहाच्या दरवाजाची सिमेंट काँक्रिटची चौकट काढून घरात प्रवेश केला. अलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.
विकी जयस्वाल व त्यांचे कुटुंब सायंकाळी ७:३० वाजता घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. जयस्वाल यांनी तात्काळ तुमसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ चार पथक तयार केले. तामसवाडी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी पोलिसांनी केली. शहरात कामानिमित्त आलेले परप्रांतीय व इतर गावांतील लोकांना बोलावून त्यांचीही विचारपूस केली. तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम करीत आहेत.