साकोली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 09:56 PM2018-09-25T21:56:55+5:302018-09-25T21:57:52+5:30
पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत काही दिवसांपासून चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. गत महिन्यात एकोडी येथे अज्ञात चोरट्यानी स्टेट बँकेचे एटीएम फोडले होते. त्यानंतर लहान सहान चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाही. एटीएम चोरीची घटना ताजी असतांना शनिवारच्या रात्री विर्शी येथील महाराष्टÑ बँकेची तिजोरी फोडून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपये लंपास केले. बँकेत रात्रीचा चौकीदार नसल्याने चोरट्यांचे फावले. परंतु चोरटे गॅस कटर घेवून बँकेत शिरतात. तेव्हा पोलिसांची गस्त नव्हती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विर्शी या गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अद्यापपर्यंत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाही. विशेष म्हणजे चोरीमध्ये चारचाकी वाहनांचा उपयोग झाल्याचा संशय आहे. तसेच गॅस सिलिंडरही साकोलीच्या नागझीरा रोडवरील एका ट्रेडर्समधील आहे. तालुक्यात जणू चोरट्यांचे समेलन भरल्याचा भास होत आहे.
वाढत्या चोरीच्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. साकोलीचे ठाणेदार मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधिक्षकांनीच या तालुक्याकडे लक्ष देवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
चोरट्यांची हिम्मत वाढली
पोलीस कोणतीच कारवाई करीत नसल्याने तालुक्यात चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे दिसून येत आहे. साकोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेली बँक फोडली जाते. चोरटे रक्कम घेवून पसार होतात. मात्र पोलिसांना त्याची साधी कुणकुणही लागूनही नागरिकांना चोरीचा प्रकार दिसावा. त्यानंतर पोलिसांनी धाव घ्यावी नेहमीच्या पध्दतीने सोपस्कार पार पाडून स्वानपथकालाही आणण्यात आले मात्र चोरटे हाती लागले नाही. पोलिसांच्या रात्रगस्तीवर संशय निर्माण झाला असून पोलीस गस्तीऐवजी राष्ट्रीय महामार्गावर वसुलीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येते.