महामार्गाचा सिमेंट रस्ता तहानलेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:02 PM2019-04-02T22:02:30+5:302019-04-02T22:02:45+5:30
मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाकरिता सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. सिमेंटीकरण बांधकामाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. भर उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. देव्हाडी-खापा शिवारातील सिमेंट रस्ता तहानलेला असून अत्यल्प पाण्याचा वापर येथे सुरू आहे. कोट्यवधींच्या रस्ता बांधकामावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथे केवळ थातूरमातूर पाणी टाकण्याचा केवळ सोपस्कार पार पाडला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाकरिता सिमेंट रस्त्याचे बांधकाम सध्या जोमात सुरू आहे. सिमेंटीकरण बांधकामाला मुबलक पाण्याची नितांत गरज असते. भर उन्हाळ्यात पाण्याचा ठणठणाट असतो. देव्हाडी-खापा शिवारातील सिमेंट रस्ता तहानलेला असून अत्यल्प पाण्याचा वापर येथे सुरू आहे. कोट्यवधींच्या रस्ता बांधकामावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथे केवळ थातूरमातूर पाणी टाकण्याचा केवळ सोपस्कार पार पाडला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
मनसर - गोंदिया - बालाघाट दरम्यान पूर्वी राज्य मार्ग होते. सदर राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करण्यात आले. दुपदरीकरणाची कामे सध्या सुरु आहेत. कोट्यवधींची ही कामे असून देव्हाडी-खापा शिवारात सीमेंट रस्ता बांधकाम सुरु आहे. सीमेंट, गिट्टी व इतर केमीकलचे मिश्रण घालून टणक सीमेंट रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. सीमेंट रस्ता व पाणी यांचे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाण निश्चित केले आहे. परंतु येथे केवळ थातूरमातूर पाण्याचा उपयोग केला जात आहे.
रस्ता पांढरा, भुसभूशीत सध्या दिसत आहे. भर उन्हाळा सध्या सुरु झाला असून ४२ अंशापर्यंत उन्हाचा पारा वाढला आहे. रस्त्यावर पाणी शिंपडल्यावर केवळ पाच मिनिटात पाण्याचे बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरु होते. पाण्याचा योग्य प्रमाणात वापर न केल्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची निश्चित शक्यता आहे.
पाण्याअभावी येथे रस्ता तहानलेला दिसून येत आहे. सदर रस्त्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाचे नियंत्रण आहे. भंडारा येथे संबंधित विभागाचे कार्यालय असून नागपूर येथे मुख्य कार्यालय असल्याची माहिती आहे.
सीमेंट रस्ता बांधकामाचे निश्चित नियम असून अत्यंत काटेकोरपणे सदर रस्ता बांधकामाचे निर्देश संबंधित विभागाने दिले आहेत. नागरिकांना सध्या पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. विहिरी व तलावांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. सदर सीमेंट रस्त्यावरील लाखो लिटर पाणी कुठून उपलब्ध होत असेल हा संशोधनाचा विषय आहे.
सध्या सर्व सरकारी मिशनरी निवडणूक कामात व्यस्त आहे. रस्ता बांधकामाकडे कुणाचे लक्ष असेल हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो. किमान कोट्यवधींची कामे सुरु असताना नियमांची पायमल्ली तर होत नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे.