अल्पवयीनांकडून दीड लाखांचे साहित्य जप्त
By admin | Published: April 10, 2017 12:30 AM2017-04-10T00:30:39+5:302017-04-10T00:30:39+5:30
आयपीएलचे सामने पाहता यावे स्थानिक विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून तीन महिन्यांपूर्वी चोरी करण्यात ...
दोन मुलांना पकडले : पवनी पोलिसांची कारवाई, खबऱ्यांच्या आधारे लागला सुगावा, क्रिकेट मॅच पाहण्यासाठी लावली शक्कल
पवनी : आयपीएलचे सामने पाहता यावे स्थानिक विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून तीन महिन्यांपूर्वी चोरी करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्य दोन अल्पवयीन मुलांकडून पवनी पोलिसांनी जप्त केले. ही संपूर्ण कारवाई पोलिसांनी रविवारी उघड केली. या साहित्यांची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असल्याचे समजते.
या कारवाईत संगणक, प्रोजेक्टर व इतर साहित्य चोरीला गेलेले होते. गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी खबरे लावलेले होते.
जवळपास तीन महिन्यानंतर आरोपी शोधण्यात पवनी पोलिसांना यश आले. यात दोन अल्पवयीन मुलांकडून चोरीला गेलेले संपूर्ण साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आयपीएलचे सामने सुरु झाल्याने प्रोजेक्टरवर सामने पाहायचे आहेत असे आरोपीपैकी एकाने त्यांच्या मित्राजवळ सांगितले. घरगुती वापरासाठी कोणीही प्रोजेक्टर विकत घेत नाही ही शंका मित्राला आल्याने त्याने तशी माहिती पवनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी सापळा रचून अल्पवयीन मुलाच्या घरी छापा घातला. यात दोन एलसीडी मॉनीटर, तीन सीपीयु, डी.व्ही.डी. प्लेअर, एम्प्लीफायर प्रोजेक्टर व संगणकाला लागणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सर्व साहित्य जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपास पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, पोलीस शिपाई मनिष कनकूरीया व नंदनवार तपास करीत आहेत. दोन्ही अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)