हे तर शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 06:02 PM2022-09-20T18:02:33+5:302022-09-20T18:08:22+5:30
तीन हजार कोटींची मदत गेली कुठे?
भंडारा : राज्यात गत अडीच महिन्यांत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. असे असतानाही सरकार आहे की नाही, असे जाणवत आहे. बळीराजा आत्महत्या करत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. आत्महत्यामुक्त राज्य करू, असे अभिवचन देणारे सरकार आता शेतकरी आत्महत्या वाढविण्याचे धोरण राबवत असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
मंगळवारी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा परिसरात अतिवृष्टी व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतल्यानंतर भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ नेते नरेश डहारे, जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले, भंडारा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे धानपीक अक्षरशः सडून गेले आहे. आजही शेतशिवारात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. परंतु, हे सरकार झोपल्याचे सोंग घेऊन आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असताना कृषिमंत्री फक्त घोषणा करून मोकळे होत आहेत. कृषिमंत्र्यांनी तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली, मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तीन रुपयेही आले नाहीत. आपद्ग्रस्तांना मदत करण्याऐवजी वेळ मारून नेली जात आहे. राज्यात सर्वत्र अशीच स्थिती आहे. ठाकरे सरकारशी गद्दारी करून स्थापन केलेले हे सरकार सर्वच स्तरावर सपेशल फेल ठरल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला.