‘त्या’ मारेकऱ्यांना अटक
By admin | Published: February 16, 2017 12:19 AM2017-02-16T00:19:17+5:302017-02-16T00:19:17+5:30
उधारीचे पैसे मागण्यावरुन सारंग अजय शामकुवर (१८) रा. लाखनी याची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या ....
प्रकरण पुरकाबोडी येथील : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अड्याळ /लाखनी : उधारीचे पैसे मागण्यावरुन सारंग अजय शामकुवर (१८) रा. लाखनी याची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या दोन मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथील बर्डी परीसरात सापळा रचून अटक केली. छोटु आकरे व सुरज वासनिक (दोन्ही रा. लाखनी) असे अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत.
१२ फेब्रुवारीला अजय दुर्योधन शामकुवर यांनी पोलीस ठाणे लाखनी येथे तक्रार दिली. यात सारंग शामकुवर (१८) हा १२ फेब्रुवारी रोजी रोजी दुपारी ३.३० वाजता दरम्यान घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे, अशा आशयाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रकरण नोंदविले. त्यानंतर सारंगचा शोध घेणे सुरु झाले. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान सारंगचा मृतदेह अड्याळ पोलीस ठाणे हद्दीतील माडगी जंगल शिवार पुरकाबोडी रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. सारंगचा खून पैशाच्या वादातून लाखनी येथील प्रवीण ऊर्फ छोटु आसाराम आकरे व सुरज ऊर्फ बोदु भैय्यालाल वासनिक यांनीच केली, याबाबत पोलीस ठाणे अड्याळ येथे दोन्ही आरोपीतांविरुध्द भादंवि ३०२,३४ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
प्रवीण ऊर्फ छोटु आकरे याच्याकडुन सारंग शामकुंवर याने काही पैसे उधार घेतले होते. उधारीचे पैसे मागण्याकरिता प्रवीणने सारंगकडे तगादा लावला होता. परंतु सारंगकडे पैसे जमत नसल्याने त्याने पैसे दिले नाही. यावरुन १२ फेब्रुवारी रोजी दुपारी मारेकऱ्यांनी सारंगला सोबत घेवून त्याला मनसोक्त दारु पाजली. त्याला पुन्हा पैशाची मागणी करु लागले. त्यावेळी सारंगने पैसे नसल्याचे सांगितले. दोन्ही मारेकऱ्यांनी सारंगला दुचाकीवर बसवून केसलवाडा मार्गे पुरकाबोडी जंगल शिवारात नेले. तेथे दगडाने ठेचुन सारंगचा खून केला.
पोलीस अधीक्षक विनीता साहु व अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांना कारवाईचे निर्देश दिले. मारेकऱ्यांना अटक करण्याकरिता तीन पथक तयार केले. मारेकरी नागपूर येथील बर्डी परीसरात फिरत आहेत, अशी माहिती १५ फेब्रुवारीला सकाळी मिळाली. माहितीच्या बर्डी परीसरात सापळा रचुन दोन्ही मारकऱ्यांना पकडण्यात आले. दोघांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, अड्याळचे सहायक पोलीस निरीक्षक अजाबराव नेवार, पीएसआय एस. एच. रिजवी, सहायक फौजदार प्रितीलाल राहांगडाले, हवालदार धर्मेद्र बोरकर, सुधीर मडामे, वामन ठाकरे, राजेश गजभिये, विनायक रेहपाडे , रोशन गजभिये, दिनेश आंबेडारे, वैभव चामट, स्नेहल गजभिये, बबन अतकरी, कौशीक गजभिये, चालक हवालदार रामटेके, ठवकर यांनी सहभाग नोंदविला. (वार्ताहर/शहर प्रतिनिधी)
लाखनीच्या ठाणेदारांना बडतर्फ करा -वडिलाची मागणी
लाखनी शहरात छोटु आकरे याचा जुगार, सट्टा, कोंबडबाजार व अवैध सावकारीचा धंदा आहे. व्याजानिशी दिलेले पैसे परत दिले नाही तर जीवानिशी ठार मारेन अशी धमकीही दिली होती. या संदर्भात लाखनी पोलीस ठाण्यात मृतक सारंगचे वडील अजय श्यामकु वर हे तक्रार देण्यासाठी गेले असता, ठाणेदार चकाटे यांनी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्याला व्याजासहित परत करावेच लागेल, असे धमकावून बोलले. अन्यथा तुझ्यावर व तुझ्या मुलावर गुन्हा दाखल करुन अटक करेन, असेही बोलले. त्याचवेळी माझी तक्रार घेवून आकरे याच्यावर कारवाई केली असती तर कदाचित आज सारंग जिवंत असता. सारंगच्या मृत्यूला ठाणेदार चकाटेही जबाबदार असल्याचा आरोप अजय श्यामकु वर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. ठाणेदार चकाटे यांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांनी या घटनेचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लाखनी बंदचा इशाराही मेश्राम यांनी दिला आहे. यावेळी प्रशांत जोंधळे, विठोबा कांबळे, भिकाराम बागडे, अश्विनी भिवगडे, रमेश रामटेके, दिनेश वासनिक, सुधाकर मेश्राम, विनोद रामटेके आदी उपस्थित होते.