‘त्या’ लाभार्थ्यांना मिळणार दोन कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:18 AM2017-07-22T01:18:39+5:302017-07-22T01:18:39+5:30
तुमसर पंचायत समिती अंतर्गत शौचालय बांधकामांचे लाभार्थ्यांना सुमारे चार कोटींचा निधी मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे.
आश्वासन : प्रकरण शौचालय बांधकामाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर पंचायत समिती अंतर्गत शौचालय बांधकामांचे लाभार्थ्यांना सुमारे चार कोटींचा निधी मागील सहा महिन्यांपासून थकीत आहे. लाभार्थ्यांना याचा फटका बसत आहे. तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना याप्रकरणी भेटून चर्चा केली. येत्या आठ दिवसात तुमसर पंचायत समितीला दोन कोटींचा निधी मिळणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले.
तुमसर तालुक्यात शौचालय बांधकामांचा प्रचार व प्रसार पंचायत समितीच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केला होता. तालुक्यातील नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही मोहिम येथे राबविण्यात आली. लाभार्थ्यांनी स्वत:जवळील रूपये खर्च केले तर काहींनी कर्ज घेऊन शौचालय बांधले. शौचालय बांधकाम झाल्यावर उर्वरित रक्कम मिळाली नाही. स्थानिक पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना लाभार्थ्यांनी जाब विचारला स्वत: लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात येऊन निधीची मागणी केली. परंतु त्यांना शासनाकडून निधी प्राप्त झाली नाही, असे उत्तर देण्यात येत होते.
दोन दिसापुर्वी तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी यांची भेट घेऊन शौचालय बांधकाम निधीबाबत चर्चा केली.
सुर्यवंशी यांनी भंडारा जिल्ह्याकरिता सहा कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यातील दोन कोटी रूपये आठ दिवसात तुमसर तालुक्याला देण्याचे आश्वासन दिले. लाभार्थ्यांना येथे लवकरच निधी प्राप्त होणार आहे. मागील सहा महिन्यापासून निधीची येथे लाभार्थ्यांना प्रतिक्षा होती. निधीला विलंब कां लागला याचे उत्तर कुणीच देत नाही. कर्ज घेऊन शौचालयांचे बांधकाम करण्यात आले हे विशेष. शासकीय योजना व उपक्रमात सहभाग नोंदविणाऱ्या लाभार्थ्यांना किमान निधी करीता फरफट न व्हावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यातील शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना सुमारे दोन कोटींचा निधी आठ दिवसात प्राप्त होणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. लाभार्थ्यांना बरेच दिवस येथे प्रतिक्षा करावी लागली. यापुढे तात्काळ निधी प्राप्त होण्याची गरज आहे.
-हिरालाल नागपुरे,
गटनेते पंचायत समिती तुमसर.