‘त्या’ २५ घरातील कुटुंब मृत्यूच्या दाढेत
By admin | Published: April 7, 2016 12:25 AM2016-04-07T00:25:22+5:302016-04-07T00:25:22+5:30
वैनगंगा नदीपात्र सन २०१२ पासून गावाच्या दिशेने झपाट्याने वाढत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : रेड झोनमध्ये वास्तव्य
मोहन भोयर तुमसर
वैनगंगा नदीपात्र सन २०१२ पासून गावाच्या दिशेने झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत ३३.११ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गिळंकृत झाली. ४८.८० हेक्टर शेतीला याचा प्रत्यक्ष फटका बसला. रेंगेपार येथे भीषण स्थिती दृष्य बघितल्यावर येते. अक्षरश: मृत्यूच्या दाढेत येथे २० ते २५ घरे आहेत. रस्ता व नदीचे अंतर केवळ दोन फुट इतके शिल्लक आहे. परंतु शासन व प्रशासनाने कोणतीच कारवाई केलेली दिसत नाही.
वैनगंगा जीवनदायीनी मागील शेकडो वर्षापासून निरंतर वाहत आहे. प्रचंड वाळू उपस्यामुळे नदीने पात्र बदलविले असून ती गावाच्या दिशेने झपाट्याने येत आहे. सन २०१२ पासून वैनगंगा नदीने रेंगेपार, बोरी, कोष्टी, उमरवाडा येथील ३३.११ हेक्टर शेतजमिन नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. तर ४८.८० हेक्टर शेतजमिनीला याचा प्रत्यक्ष फटका बसला आहे. या गावातील नदीकाठावरील विहिरी व जलकुंभ नदीपात्रात गेले. लाखोंचे नुकसान येथे झाले आहे. रेंगेपार येथे वैनगंगा नदी झपाट्याने गावाला कवेत घेण्याकरिता सरसावीत आहे. येथील २० ते २५ घरांचे अंतर नदीकाठापासून केवळ दोन फुटावर आहे. नदीकाठ येथे खूप उंच असून खाली दरी दिसते. मागील वर्षी पाऊस अत्यल्प पडल्याने नदीने रौद्र रुप धारण केले नव्हते. काहींचे मागील दार एक फुटावर येवून ठेपले आहे. गाळाची सुपिक जमीन गरीब शेतकऱ्यांची नदी पात्रात गेगली. रेंगेपार येथे जिल्हा परिषदेची शाळा रस्त्याच्या पलिकडे आहे. शाळेचे अंतर अगदी कमी आहे. रेंगेपार सिलेगाव रस्त्यावरून बसगाड्या व इतर वाहने दिवसभर धावतात. चालकाचे नियंत्रण सुटले तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भूखंड दिले
राज्य शासनाने रेंगेपार येथे आंदोलनानंतर भूखंड दिले. परंतु स्थानिक नागरीक गरीब असल्याने त्यांनी अजूनपर्यंत घरे बांधली नाही. त्यामुळे ते अजूनही धोकादायक रेड झोन मधील घरातच वास्तव्य करीत आहेत.
रेंगेपारची स्थिती अतिशय भयानक आहे. किमान अर्धा गाव रेड झोनमध्ये आहे. शासनाने केवळ भूखंड दिले. परंतु गरीबांना येथे घरे बांधून देण्याची गरज आहे. गावाचे काय होईल याची चिंता ग्रामस्थांना आहे.
- हिरालाल नागपुरे
गटनेता, पं.स. तुमसर