‘त्या’ मुख्याध्यापकांसाठी पिंडकेपारवासीय एकवटले
By admin | Published: January 15, 2017 12:31 AM2017-01-15T00:31:22+5:302017-01-15T00:31:22+5:30
मुख्याध्यापक श्रावण हजारे यांच्यामुळे पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेला वैभव आले आहे. त्यांच्यामुळे शाळेत विद्यार्थी आहेत.
भंडारा : मुख्याध्यापक श्रावण हजारे यांच्यामुळे पिंडकेपार जिल्हा परिषद शाळेला वैभव आले आहे. त्यांच्यामुळे शाळेत विद्यार्थी आहेत. असे असताना ज्यांची मुले या शाळेत नाहीत, अशांनी त्यांना हटविण्याची मागणी केली. हा प्रकार निंदणीय असून हजारे यांची बदली केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा पिंडकेपार येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
पिंडकेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता १ ते ४ या वर्गात ३२ विद्यार्थी आहेत. शाळेची इमारत जीर्ण झाल्यामुळे आणि हे गाव पूरबाधित क्षेत्रात येत असल्यामुळे याठिकाणी नवीन ईमारत बांधता येत नाही. दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच दुरूस्तीचे कामे होणार आहेत.
शाळेला कुलूप ठोकले या आशयाचे वृत्त प्रकाशित होताच पिंडकेपार येथील ग्रामस्थ संतप्त झाले. कुलूप ठोकणाऱ्यांची मुले या शाळेत शिकत नसल्याचा आरोप क्रिष्णा आतीलकर, गुलाब सेलोकर, ओमप्रकाश कांबळे, शुक्राचार्य जमजार, बिरबल गभणे, मनोज मेश्राम, ताराचंद मडामे, सुनिल राऊत, सुलाभ राऊत, महेश रामटेके, सुरेश मेश्राम, कवडू मेश्राम, रूपेश मडामे यांनी केला आहे. ही शाळा झाडाखाली सुरू होती, असे असताना मुख्याध्यापक श्रावण हजारे यांनी स्वत:चे पैसे खर्च करून समाज मंदिरात शाळा सुरू केली, संपूर्ण गाव त्यांचे ऋणी असल्याचे पालकांनी ‘लोकमत’मध्ये येऊन सांगितले.
या शाळेत ३२ विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी ३० पालक मुख्याध्यापकांच्या बाजुने असून आम्ही पालक असूनही आमच्या मुलांना समोर करून छायाचित्र काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविणार असल्याचे पालकांनी म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मुख्याध्यापक श्रावण हजारे यांचे काम समाधानकारक आहे. स्वखर्चातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा तयार करून शाळा चालविणारे ते आदर्श शिक्षक आहेत. या शाळेच्या दुरूस्तीला तातडीने निधी मिळवून देण्यासाठी सभागृहात पाठपुरावा केला. लवकरच तीन लाखांचा निधी शाळा दुरूस्तीसाठी मंजूर होत आहे.
- जया सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य.
कुठल्याही गोष्टीचा राग व्यक्त करण्यासाठी विविध संवैधानिक मार्ग आहेत. शाळेला कुलूप ठोकण्यापूर्वी त्याची रितसर तक्रार करावी लागते. जो शिक्षक स्वमेहनतीतून शिक्षणासोबतच शाळेत सुविधा निर्माण करतो, अशा शिक्षकांविरूद्ध कारस्थान रचणे, हे लोकशाहीला धोकादायक आहे. आदर्श कामासाठी शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती झाली असल्यामुळे या समितीकडून आदर्श कामे व्हावीत.
- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघटना.
आधीच ही शाळा वर्षभरापासून बंद आहे. ही शाळा समाजमंदिरात भरते. समाज मंदिरात मुख्याध्यपक हजारे यांनी स्वत:चे ४० हजार रूपये खर्च करून बसण्यायोग्य जागा तयार केली. अशा कर्तव्यदक्ष मुख्यापकांची गरज आहे.
- देवनाथ रामटेके, माजी सरपंच, पिंडकेपार.