‘त्या’ राष्ट्रीयीकृत बँकेतील खातेधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 01:02 AM2019-04-21T01:02:14+5:302019-04-21T01:03:00+5:30
जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात ग्राहकांच्या सेवेसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या अनेक शाखा असल्या तरी पंजाब नॅशनल बँकेची शहरात एकमेव शाखा आहे. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दररोज गत अनेक दिवसापासून त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पंजाब नॅशनल बँकेत कर्मचाऱ्यांची वानवा असून शहरात इतरत्र कुठेही शाखा नाही. त्यामुळे खातेधारकांची दररोज गर्दी कायम राहते.
व्यापारी, आबालवृद्ध, विद्यार्थी त्यांच्यासह अनेक जणांची बँकेत व्यवहार असल्याने लग्नसराईच्या दिवसात खातेधारकांना दररोज तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. सकाळी १०.३० वाजतापासून बँकेत लांबच लांब रांगा लागतात. बँकेत कर्मचारी, एक शाखा प्रमुख, एक इन्चार्ज आॅफीसर, दोन कारकून आणि एक आर्थिक देवाण घेवाणीचा काउंटर एवढ्यावरच बँकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे दिवसभरात मर्यादित कामे होत असल्याने खातेधारकांना पुन्हा दुसºया दिवशी आपल्या कामासाठी हेलपाट्या माराव्या लागतात.
उन्हाळ्याच्या दिवसात बँकेत आलेल्या ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील केलेली नाही. सोमवारी खातेधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव अरुण गोंडाणे यांनी बँक महिला कर्मचाºयाला ग्राहकांच्या होणाºया त्रासाबद्दल विचारणा केली. तेव्हा त्या कर्मचाºयाने उलटसुलट उत्तरे देत आम्ही काय करणार? आम्ही काही करू शकत नाही? अशा प्रकारे उलट सुलट उत्तरे दिली.
नाव विचारताच नावाला काय करायचे आहे असे सांगत लोकप्रतिनिधींना देखील हे बँक कर्मचारी जुमानत नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा गैरवर्तणूक करणाºया बँक कर्मचाºयांवर तात्काळ कारवाई करून खातेधारकांना न्याय देण्याची गरज आहे.
कर्मचाऱ्यांची वानवा
कर्मचाºयांची लंच टायमिंग, पाणी पिणे, चहासाठी बाहेर जाणे यासारख्या कारणांमुळे देखील ग्राहकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. याबाबत शाखा प्रमुखांना देखील अनेक खातेधारकांनी याबाबत सांगितले आहे. परंतु त्याबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. बँकेत कर्मचाºयांची वानवा असल्याने कामाचा ताण वाढला आहे.
जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीत वाढ
शहरासह ग्रामीण भागात आर्थिक देवाण घेवाणीसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढल्या असल्या तरी वाढत्या खातेधारकांच्या संख्येमुळे व लिंक फेलच्या ग्रहणामुळे बँक कर्मचारी सातत्याने ग्राहकांवर संतापत असल्याचे प्रकार वाढले आहेत. आबाल वृद्धासह विद्यार्थ्यांचे हाल होत असताना बँक कर्मचाºयांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत जनसामान्यांत रोष दिसून येत आहे.