परराज्यात अडकलेल्यांनी संपर्क साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 05:00 AM2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:19+5:30
नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यावेळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनमुळे देशात सर्वच प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक बाहेर राज्यात व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून पडलेल्या भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी तेथील जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.
कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेसंबंधी जिल्हयातील पोलीस अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच इतर विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यावेळी उपस्थित होते.
कोरोना संसगार्साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन केले तसेच सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. तसेच आपल्या जिल्ह्यातही इतर राज्यातील व जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था प्रशासनाद्वारे करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्हा प्रशासन त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या आणि स्वगृही परत जाण्यास इच्छूक नागरिकांची यादी तयार करीत आहे. जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच भंडारा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास फोनद्वारे संपर्क करून द्यावी. यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, अडकलेल्या ठिकाणाचा पत्ता, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती द्यावी. तसेच ज्या जिल्ह्यातुन प्रवास करावयाचा आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करावा. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करतांना करावयाच्या प्रक्रियेबाबत त्यांना सविस्तर माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
याठिकाणी पोलीस, तहसिल कार्यालय, गटविकास अधिकारी, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा घेतल्या आहेत. कागदपत्राविना आलेल्या व्यक्तीस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.