‘त्या’ शिक्षक नेत्यांची झाली ‘घरवापसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:00 PM2018-01-13T22:00:02+5:302018-01-13T22:01:35+5:30
मकरसंक्रांत हा भारतीय सणांमधील महत्वाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मकरसंक्रांत हा भारतीय सणांमधील महत्वाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. वर्षभरात होणारे हेवेदावे किंवा वादविवाद बाजूला सारून या दिवसाच्या पर्वावर ‘तिळगुळ घ्या व गोड गोड बोला’ असे म्हणून वाद संपुष्टात आणण्याचा दिवस म्हणून ओळखल्या जातो. याची प्रचिती आज भंडारा शहरात आली. एकाच संघटनेत राहून फारकत घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या शिक्षक नेत्यांना पुन्हा संघटनेत प्रवेश देऊन त्यांची घरवापसी झाली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षक संस्थेवर वर्चस्व आहे. मात्र काही मतभेदामुळे मध्यंतरीच्या काळात या संघटनेत फुट पडली होती. संघटनेतून बाहेर पडलेल्या शिक्षक नेत्यांना पुन्हा संघटनेत सामावून घेत त्यांच्यासह अन्य काही संघटनांच्या शेकडो शिक्षकांनीही आज प्रवेशाचा सोपस्कार पार पाडला. भंडारा शहरातील श्री संताजी सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात या शिक्षकांनी प्रवेश घेतला.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या दोन संघटना अस्तित्वात आहेत. या संघटनांचे पत संस्थांवर वर्चस्व आहे. शिक्षक पत संस्थेत काही मतभेदांमुळे या दोन संघटनांच्या नेत्यांनी बंड पुकारून आपल्याच संघटनेविरूद्ध दुसरी चुल स्थापन करून प्रस्तापितांना हादरा दिला. शिक्षक पत संस्थेत सत्तारूढ गटातील संचालकांनी मे महिन्यात बंडाचा झेंडा हातात घेवून आपली सत्ता काबिज केली. त्यामुळे या संघटनेमध्ये अंतर्गत कलह उडाला होता.
मात्र मागील काही दिवसांपासून या शिक्षक नेत्यांना घरवापसी करण्याच्या दृष्टीने खलबत्ते सुरू झाले होते. ज्या शिक्षकांच्या संघटनेतील पुनर्रप्रवेशाचा मार्ग आज शनिवारला मोकळा झाला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शेकडो शिक्षकांनी आज संघटनेत प्रवेश घेतला. यामध्ये शिक्षक पत संस्थेचे उपाध्यक्ष रमेश काटेखाये व संचालक शंकर नखाते यांच्यासह मुकेश मेश्राम, कोमलसिंह चव्हाण, सुरेंद्र उके, प्रकाश अलोणे, रामेश्वर कांबळे, दिगांबर जिभकाटे, सुधीर माकडे, ए.आर. सावरबांधे, सुधाकर गोल्लर, संतोष कारेमोरे, वनवास धनिस्कर, मधुकर लेंडे, जीवनप्रकाश काटेखाये यांच्यासह आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील कैलास बुद्धे, शुद्धोधन बोरकर, बारई यांच्यासह सुमारे ६० ते ७० शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेत प्रवेश केला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर झालेल्या या प्रवेशाने जुने वादविवाद सोडा, नवीन मार्गक्रमण करा यासाठी सर्वांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून संघटनेसाठी सहकार्य करण्याचे अभिवचन या माध्यमातून दिले. या प्रवेशादरम्यान पत संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर, दिलीप बावनकर, अनिल गयगये यांच्यासह महिला शिक्षक नेत्यांमध्ये असलेला वाद या माध्यमातून मिटल्याचे सुतोवाच या प्रवेशादरम्यान जाहीर करण्यात आले.