‘त्या’ ग्रामस्थांचा मृत्यूशी दररोजचा सामना!
By admin | Published: June 18, 2016 12:22 AM2016-06-18T00:22:42+5:302016-06-18T00:22:42+5:30
साहेब... वाघ रोजच दिसतोजी. वाघाच्या भितीने शेतावर जावे कसे? तो कोणत्या दिशेने वाघ येईल, अनं् कोणत्या दिशेने नाही. याचा नेम नाही.
व्यथा पाऊणगावची : जंगलव्याप्त ग्रामस्थांची खासदारांसमोर आपबिती
नंदू परसावार भंडारा
साहेब... वाघ रोजच दिसतोजी. वाघाच्या भितीने शेतावर जावे कसे? तो कोणत्या दिशेने वाघ येईल, अनं् कोणत्या दिशेने नाही. याचा नेम नाही. कवा तो आमची नरडी पिचकेल माहित नाही. वावरात गेलो की, घरी वापस जाणार की नाही, याचा नेम नाही. गावात एसटी येत नाही. त्यामुळे जंगलातून पोरांना पाठवावं लागतं. आमच्या पोरांचं शिक्षण बुडतं. शहरातील पोरांसारखं आम्हालाबी आमचे पोरं शिकावयचे हाय. पण वाघाची भीती हाय; अशी आपबिती खासदार नाना पटोले यांच्याजवळ कथन करीत होते, जंगलव्याप्त भागातील परसोडी, पाऊनगांव, खापरी येथील ग्रामस्थ.
पवनी तालुक्यातील परसोडी, पाऊनगाव, खापरी या गावाला तीन बाजूंनी पाण्याचा वेढा तर एका बाजूने जंगल आहे. अशा गर्तेत अडकलेल्या गावकऱ्यांना वाघ हा रस्त्यात रोजचं आडवा येतो. याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर होत आहे. मुलांना शिकवून मोठं करावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा. पण बस गावात पोहचत नसल्याने मुलांचा जीव मुठीत घालून त्यांना शिक्षणासाठी बाहेर पाठविले जाते. अशा भयान स्थितीत जीव मुठीत घेऊन येथील ग्रामस्थ जगत आहेत.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला लागगून असलेल्या या गावातील आणि हिंस्त्रप्राण्यांमुळे थरकाप उडविणारी ही परिस्थिती गुरूवारला अनुभवली, खासदार नाना पटोले यांनी. दोन दिवसांपूर्वी परसोडी या गावातील रूपचंद माटे हे गावाशेजारी शौचास गेले असता वाघाने त्यांना भक्ष्य बनविले. त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन व वनविभागाकडून मिळणारी मदत देण्यासाठी नाना पटोले हे गावात पोहचले. त्यावेळी मरणाच्या उंबरठ्यावरील ग्रामस्थांनी आपबिती कथन केली. शासनाने जंगल व वन्यप्राणी वाचविण्यासाठी कायदाच बनविला आहे. वन्यप्राण्यांना ठार करणाऱ्यांना शिक्षा होते. वाघाने माणसाला मारल्यास वाघाला सजा होत नाही, त्यामुळे एक तर वाघाला मारा किंवा गावाची मृत्यूच्या दाढेतून सुटका करा, असे आर्जव ग्रामस्थांनी केले. रूपचंद हा वाघाच्या हल्ल्यातील जंगलव्याप्त गावातील तिसरा बळी ठरला. वाघाच्या हल्ल्यात गायी, म्हैसी शेळ्या गमावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाघाला काठीने हाकण्याचा अनुभव रोजचा आहे.
वाघाचा बंदोबस्त करा
ग्रामस्थांची एकमुखी मागणी
जंगलात शेती, शेतीत वाघ मग कसायची कशी? या प्रश्नाने वातावरण गंभीर झाले. नरभक्षी वाघ लवकरच पकडू, या खासदार पटोले यांच्या आश्वासनाने वातावरण निवळायला मदत झाली. उपवनसंरक्षक प्रविणकुमार यांनीही होकारार्थी मान डोलावली उपस्थित ग्रामस्थांना हायसे वाटले. या दुर्गम भागात खासदार पहिल्यांदाच गेले होते. दिवाकरची पत्नी या गर्दीत पोहचली. तिच्या आक्रोशाने वातावरण अधिकच भाऊक झाले. गावाच्या तिन्ही बाजुनी पाण्याचा वेढा तर एका बजून जंगल, पवनीला जाणारा रस्ता येथूनच ३५० लोकसंख्येचे हे गाव चितांग्रस्त असल्याचे, पोलीस पाटील नरेश कुकुटकर खासदारांना सांगत होते.
वाघ हा दररोज रस्ता अडवतो, त्यामुळे कित्येकदा बाजार करता येत नाही. व्यवहार ठप्प होतात. मुलांची शाळाही डुबते. म्हणून आम्हाला बस सुरू करून द्या एवढीच मागणी. या गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मंत्रालयात पोहचला लवकरच तोडगा काढु, असे आश्वासक उत्तर नाना पटोले यांनी दिले. तिच स्थिती खापरी गावाची होती. यावेळी कौशल्या माहूरे, शंकर माहाजन यांनी वाघाच्या झटापटीत शरीराला झालेल्या जखमा दाखविल्या, ते पाहून मन हेलावले. त्यांनी वर्णीनेला हा प्रसंग ऐकूण अंगाला झिनझिण्या येत होत्या. त्यांना आश्वासक उत्तराशिवाय खासदारांसमोर दुसरा पर्याय नव्हता. सहा वाघामुळे प्रकाशझोतात आलेला उमरेड कऱ्हांडला अभयारण्याच्या पाठीमागचे हे चित्र आहे. या परिसरातील लोकांचे दु:ख कधी सुटणार हाच ज्याचा त्याचा प्रश्न होता. या गावातून जातेवेळी सर्वांची आस नाना पटोले यांच्यावर टिकून होती. ग्रामस्थांचा निरोप घेताना खासदार पटोले यांनाही अश्रु आवरणे कठीण झाले होते.