कोरोनाचे एक हजार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:38+5:302021-05-13T04:35:38+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत एक हजार बळी घेतले असून, सर्वाधिक मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाले आहेत. एकट्या एप्रिल ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत एक हजार बळी घेतले असून, सर्वाधिक मृत्यू कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाले आहेत. एकट्या एप्रिल महिन्यात ४८९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या तांडवाने एप्रिल महिन्यात प्रत्येक जण भयभीत झाला होता. गिरोला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. गत आठवडाभरापासून मृत्यूची संख्या घटली असल्याने दिलासा मिळत आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी २७ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर तब्बल तीन महिन्याने १२ जुलै रोजी कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात घेण्यात आली. त्यानंतरही मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. सिंगल डिजिटमध्येच मृत्यूची नोंद होत होती. परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि मृत्यूचे तांडव सुरू झाले. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार जणांचा बळी गेला आहे. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३४३ मृत्यूची नोंद होती. मात्र एप्रिल महिन्यात ४८९ जणांचा कोरोनाने बळी घेतला. मे महिन्याच्या १२ दिवसात तब्बल १३३ जणांचा बळी गेला. मृत्यूच्या या तांडवाने सर्वत्र हाहाकार उडाला होता. दुसरीकडे रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनही मिळत नव्हता. अशा विपरीत परिस्थितीत सर्वसामान्य भयभीत झाले होते.
जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू भंडारा तालुक्यात झाले आहेत. आतापर्यंत ४७३ जणांचा मृत्यू झाला. त्या खालोखाल तुमसर तालुक्यात १०७, पवनी १००, साकोली ९६, मोहाडी ९१, लाखनी ८६ आणि लाखांदूर तालुक्यात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मृत्युदर कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी ६०४ कोरोनामुक्त, ३०९ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात बुधवारी ३०९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यात भंडारा तालुका ९७, मोहाडी ३४, तुमसर २५, पवनी २१, लाखनी ६२, साकोली ५७, लाखांदूर १३ रुग्णांचा समावेश आहे तर ६०४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ६८७ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी ५१ हजार ८१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ४६०६ रुग्ण उपचाराखाली आहेत.
११ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात बुधवारी ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा ५, लाखांदूर ३, तर मोहाडी, पवनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता मृतांची संख्या एक हजार झाली आहे.
तालुकानिहाय मृतांची संख्या
तालुकाएकूण रुग्णमृत्यू
भंडारा २३,९०७ ४७३
मोहाडी ४,१९४ ९१
तुमसर ६,८७९ १०७
पवनी ५,८५९ १००
लाखनी ६,२७७ ८६
साकोली ६,८३६ ९६
लाखांदूर २,७३७ ४७
एकूण ५६,६८७१,०००