मिरची सातऱ्याने दिला हजारोंना रोजगार
By Admin | Published: March 27, 2017 12:30 AM2017-03-27T00:30:38+5:302017-03-27T00:30:38+5:30
तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही.
मजुरांसाठी 'मास्क' गरजेचे : आंध्रप्रदेशातून आणली जाते मिरची
पवनी : तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी भातपिकासाठी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. शासनाने सुध्दा मनरेगा अंतर्गत पूरेशा प्रमाणात काम उपलब्ध करुन दिले नाही. अशावेळी मजूरीवर ज्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्यासाठी हे वर्ष अत्यंत त्रासदायक होते. सहजरित्या मजूर उपलब्ध होवू शकत असलेल्या भागात मिरची सातरे सुरु केल्याने हजारो मजूरांना रोजगारांची संधी मिळालेली आहे.
तालुक्यात अल्पभुधारक व अत्यल्प भुधारकांची संख्या फार मोठी आहे. तसेच भुमिहिन शेतमजूर सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन- तीन वर्षात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी उजव्या कालव्याला सोडण्यात येत होते. त्यामुळे भुयार व सावरला जिल्हा परिषद क्षेत्रातील बहुसंख्य गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भातपिक लावलेले होते. यावर्षी दुरुस्तीचे कारण देवून कालव्यात पाणी सोडण्यास सिंचन विभागाने नकार दिला. त्यामुळे उन्हाळी भातपिकापासुन शेतकरी वंचित राहिले. शेतात पिक नाही त्यामुळे शेतमजूरांना काम नाही, मजुरांची संख्या लक्षात घेवून शासनाने मनरेगा अंतर्गत काम सुरु करावयास पाहिजे होते परंतु तसे होवू शकले नाही. कऱ्हांडला अभयारण्य व जंगलात हिस्त्र पशुची भिती त्यामुळे वनउपजांचा मजुरी म्हणून व्यवसाय करणारे सुध्दा काही करु शकले नाही. परिसरात मजूर व शेत मजुरांची फार मोठी संख्या आहे. ते सहज उपलब्ध होवू शकतात असा विचार करुन कित्येक गावात मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. प्रत्येक सातऱ्यावर किमांन शंभर मजुर काम करीत आहेत. त्यामुळे पवनी, गोसे, भोजापूर, शेळी, कान्हळगाव, निष्ठी भुयार या गावालगत मिरचीचे सातरे सुरु करण्यात आलेले आहेत. सर्व सातऱ्यावर काम करणाऱ्या मजूरांची संख्या एक हजारांवर आहे.
आंधप्रदेशातील वरंगल भागातून मिरची आणल्या जाते, त्यात तेज्ञा, बेडगी, तायवान, लवंगी, मुरला अशा विविध प्रकारची मिरची आणून सातऱ्यावर मजुरांकडून मिरचीचे देठ खुडून घेणे व दर्जेदार मिरीच निवडणे अशी कामे केली जात आहेत. मजूरांना रुपये ८ ते १५ प्रति किलो या दराने देढ खुडण्याचे काम करावे लागते. दर दिवसाला १५ ते २० किलो मिरची साफ करणाऱ्या मजुरांना दिडशे ते दोनशे रुपये याप्रमाणे मजूरी मिळत असते. देढ खुडून निवडलेली मिरची १० किलो ते २५ किलोच्या पिशवीमध्ये भरुन आंधप्रदेशात पुन्हा पाठविली जाते. काम करणाऱ्या मजूरांना श्वाच्छोश्वासाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नियमित मजुरांनी मॉस्कचा वापर करावयास पाहिजे. सदर कंपनीने मजूरांसाठी मॉस्कची सोय केल्यास आरोग्य दृष्टीने हितावह होईल, यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)