जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ
By admin | Published: February 13, 2017 12:22 AM2017-02-13T00:22:52+5:302017-02-13T00:22:52+5:30
मागील एक ते दीड महिन्यापासून तुमसर शहरात दूषित पाणीपुरवठा सुरु आहे. शनिवारी येथे नळाच्या पाण्यातून नारु आला.
नळातून निघाला नारु : दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा,
तुमसरकरांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्यांचे आयुष्य संपले
तुमसर : मागील एक ते दीड महिन्यापासून तुमसर शहरात दूषित पाणीपुरवठा सुरु आहे. शनिवारी येथे नळाच्या पाण्यातून नारु आला. तुमसर ते देव्हाडी दरम्यान शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी लिकेज असल्याने दररोज हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. शेतात सध्या पाणी जमा झालेले दिसत आहे. एकीकडे शहराला एकवेळ पाणी पुरवठा केला जातो तर दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
तुमसर शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. माडगी (दे.) येथे नदी पात्रात दोन मोठ्या विहिरी असून नदी काठावर पंपगृह आहे. पंपगृह ते तुमसर शहर असे नऊ ते दहा कि.मी. अंतर आहे. तुमसर गोंदिया राज्य महामार्ग तथा देव्हाडी तुमसर या रस्त्याशेजारून जलवाहिनी घातली आहे. जलवाहिनी ठिकठिकाणी लिकेज आहे. या लिकेजमधून दररोज हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. परंतु पालिका प्रशासनाचे येथे सातत्याने दुर्लक्ष सुरु आहे.
ही जलवाहिनी खूप जुनी आहे. या जलवाहिनीचे आयुष्य संपल्याची माहिती आहे. परंतु निधी व नियोजनाच्या अभावामुळे ही जलवाहिनीची सेवा निरंतर सुरु आहे.
शनिवारल्त्त सुभाष वॉर्डातील अनिल गिऱ्हेपुंजे यांचे घरी नळाच्या पाण्यातून नारु निघाला. दुर्गंधीयुक्त पाणी मागील एक ते सव्वा महिन्यापासून येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
तुमसर शहरात केवळ सकाळी एकच वेळ अर्धा ते पाऊण तास पाणी पुरवठा केला जातो. ३५ ते ४० लिटर केवळ पाणीपुरवठा करणे सुरु आहे. शहरात जलशुद्धीकरण केंद्र आहे. पाणी शुद्धीकरण केल्यानंतर वितरीत केल्या जाते. असा पालिका प्रशासनाचा दावा आहे. मग पाण्यातून नारु व दुर्गंधीयुक्त पाणी कुठून येते हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर शहर अर्धे तहानलेले आहे. अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन येथे करण्याची गरज आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी केवळ पाच व नऊ कि.मी. अंतरावरून वाहते. परंतु कायमस्वरुपी व पूर्ण शहराला अजूनही पाणी या मूलभूत घटकांची प्रतिक्षा आहे.
अनेक योजना यशस्वी राबविण्याचा दावा आतापर्यंत प्रत्येकांनीच केला. परंतु पाणीपुरवठा ही योजना यशस्वी राबविण्यात कुणालाच यश आले नाही. तुमसर पालिकेत भाजपाला एकहाती सत्ता प्राप्त झाली. नगरपालिकेतून राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. किमान तुमसरकरांना दोन वेळचे पाणी मुबलक देण्याकरिता येथे प्रयत्न करण्याचे आवाहन नवीन पदाधिकाऱ्यांसमोर निश्चितच आहे. (तालुका प्रतिनिधी)
जलवाहिनी लिकेजमुळे समस्या निर्माण होत आहे. शहराला जलशुद्धीकरण केलेले पाणी वितरीत करण्यात येते. लिकेज दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.
- प्रशांत गणवीर,
कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, न.प. तुमसर.