हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:16 PM2024-10-04T12:16:39+5:302024-10-04T12:17:13+5:30
Bhandara : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : मागील जुलै व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. याप्रकरणी तालुक्यातील प्रशासनाअंतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र मागील २ महिन्यांपासून क्षतिग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप आहे. नुकसानभरपाई उपलब्ध करण्याच्या मागणीला घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. लाखांदूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठविले आहे.
मागील २० ते २२ जुलै रोजी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झोडपून काढले होते. या अतिवृष्टीने तालुक्यातील तब्बल ८ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील १७ हजार १०८ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानप्रकरणी शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तर ९ ते १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८५३ शेतकऱ्यांचे ३०८ हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले आहे.
या दोन्हीप्रकरणी स्थानिक लाखांदूर तहसील प्रशासनांतर्गत क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र पंचनाम्याची कारवाई होऊन जवळपास २ महिने लोटूनदेखील अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई उपलब्ध केली नाही. अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाल्याने हजारो धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष नरेश दिवठे, तालुका महासचिव गोविंदराव बरडे, दीपक चिमणकर, देवानंद नागदेवे, लोचन पारधी, दादा अलोणे, कारू भावे, ब्रह्मदास मेश्राम, राष्ट्रपाल लोणारे, खुशाबा गजभिये, अनिल पारधी, उमेश वनस्कर आदी उपस्थित होते.