उष्माघाताने हजारो कोंबड्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:38 PM2018-05-07T22:38:26+5:302018-05-07T22:38:47+5:30
तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
किशोर डोंगरे यांच्या मालकीचे हे पोल्ट्रीफार्म असून रविवारला दुपारपासून कोंबड्यांच्या मृत्यूची सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारला सकाळी १० वाजेपर्यंत १,२०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्यामुळे डोंगरे हे कमालिचे धास्तावले. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत काही कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोंबड्यांचा मृत्यू नेमका विषबाधेने झाला की उष्माघाताने याची तपासणी करण्यासाठी त्यांनी मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांना बोलाविले. त्यांनी काही कोंबड्याचे शवविच्छेदन करून पोल्ट्रीफार्मची पाहणी केली असता या कोंबड्याचा मृत्यू हा कडक उन्हामुळे झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी डोंगरे यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पोल्ट्रीफार्म मालकांनी अशी घ्यावी काळजी
विदर्भामध्ये उन्ह चांगलीच तापत आहे. तापमान ३५ अंश सेल्सीअस पुढे गेल्यास मोठ्या पक्षांना श्वसनक्रियेत त्रास होतो व पक्षी मृत्यूचे प्रमाण वाढते. कारण पक्ष्यांना घामाच्या ग्रंथी नसल्याने श्वसनाने उष्माचे उत्सर्जन करतात. त्यांना शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे कठीण जाते. त्यामुळे पक्षी दगावतात. त्याकरिता पोल्ट्री फार्मच्या शेडमधील तापमान नियंत्रित करणे गरजेचे आहे. शेडमध्ये पंखे, फॉगर बसविणे, दुपारच्यावेळेस कोंढ्यामध्ये ओलावा निर्माण करणे, छतवरील पत्र्यांना आतुन व बाहेरून चुना लावणे, छतावर गवत किंवा तणीस टाकणे किंवा छतावर तुषार सिंचनाची व्यवस्था करणे, पाण्याची टाकी व पाण्याचे पाईप गरम होणार नाहीत याची व्यवस्था करावी, गरम हवा आत शिरणार नाही याची काळजी घेऊन दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान खाद्य देऊ नये, असे पशुधन विकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांनी सांगितले.