तुमसर येथे तीन हजार धान पोती पावसात भिजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:05 AM2018-12-19T01:05:02+5:302018-12-19T01:05:16+5:30
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ठेवलेले सुमारे तीन हजार धान पोती पावसात भिजली आहेत. बाजार समिती प्रशासनाने ताडपत्रीची व्यवस्था केल्याने काही अंशी धानपोत्यांना कमी फटका बसला तर दुसरीकडे प्लास्टीक पोत्यांमध्ये असलेले धान पावसात बचावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात ठेवलेले सुमारे तीन हजार धान पोती पावसात भिजली आहेत. बाजार समिती प्रशासनाने ताडपत्रीची व्यवस्था केल्याने काही अंशी धानपोत्यांना कमी फटका बसला तर दुसरीकडे प्लास्टीक पोत्यांमध्ये असलेले धान पावसात बचावले. परंतु ओल्या झालेल्या धानाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
तुमसर-मोहाडी कृषी उत्पन्न बाजार समिती विदर्भात प्रसिद्ध आहे. धानाचे कोठार म्हणून तुमसर मोहाडी तालुक्यांची ओळख आहे. धानाची आवक असल्याने बाजार समितीचे आवारही मोठे आहे. सुसज्ज अशी बाजार समिती आहे. परंतु काही ठिकाणी शेड नाही. बाजार समितीत धानाच्या हंगामात प्रचंड आवक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या जागेतच आपले धान पोते ठेवावे लागतात. यंदाही हजारो पोते बाजार समितीच्या यार्डात उघड्यावर ठेवली आहेत. त्यातच दोन दिवसापासून पावसाची रिपरीप सुरु आहे.
सोमवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. रात्री जोरदार बरसला. त्यात धानाची सुमारे तीन हजार पोती ओली झाली. सदर धानाचे पोते व्यापाऱ्यांची असल्याची माहिती आहे. पावसाच्या भीतीने मंगळवारी व्यापाऱ्यांनी धान पोत्यांची उचल केली.
मार्केट परिसर धानाच्या पोत्यांनी हाऊसफुल्ल असल्याने पोते कुठे ठेवावे असा प्रश्न आहे. ओला धान भरडाईत विपरीत परिणाम होतो. तांदूळ तुटतो, काळसर पडतो, भाव येत नाही, तांदळाला वास येतो. एकीकडे बाजार समिती शेतकऱ्यांच्या भरवशावर कोट्यवधींचा नफा कमावतात. परंतु धान पोती ठेवण्यासाठी शेड बांधण्याला दुय्यम स्थान देत आहेत. त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे.
देखण्या प्रवेशद्वाराची गरज काय?
तुमसर बाजार समिती देखणे प्रवेशद्वार बांधण्याच्या तयारीत आहेत. शेतकºयांच्या बाजार समितीला देखण्या प्रवेशद्वाराची गरज काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. प्रवेशद्वारावर होणारा खर्च बाजार समितीचा आहे की, अन्य निधीतून केला जात आहे हा संशोधनाचा विषय आहे. बाजार समित्या सध्या आर्थिक संकटात आहे. परंतु येथे आर्थिक संकट दिसत नाही.