वनभरतीसाठी हजारो युवक दाखल
By Admin | Published: November 7, 2016 12:42 AM2016-11-07T00:42:44+5:302016-11-07T00:42:44+5:30
नागपूर वनवृत्तांतर्गत विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे.
पहाटेपासून होणार चाचणी : भंडारा उपवन संरक्षक कार्यालय सज्ज
भंडारा : नागपूर वनवृत्तांतर्गत विभागातील रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या रिक्त पदांसाठी उद्या (दि.७) पासून भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी सुमारे १२ हजार युवक युवती सहभागी होत आहेत.
नागपूर वनविभागाच्या अखत्यारीत भंडारा, वर्धा, गोंदिया व नागपूर हे उपवनसंरक्षक कार्यालय आहेत. या चारही विभागात विविध प्रवर्गातील सुमारे १५६ रिक्त पदे आहेत. ही पदभरती प्रक्रिया वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. उद्या सोमवारपासून भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया प्रारंभ होत आहे. १५६ रिक्त जागांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातील सुमारे ४८ हजार युवक युवतींनी वन विभागाकडे अर्ज केलेले आहेत.
यातील भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयात रिक्त असलेल्या जागांचाही समावेश आहे. मुख्य वन संरक्षकांनी चारही उपवन संरक्षक कार्यालयाला १२ हजार उमेदवार विभागून दिलेले आहेत. भंडारा येथील रिक्त पदांची प्रक्रिया गडेगाव लाकूड आगारात सुरु होत आहे. ७ ते १२ नोव्हेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
उद्या पहिल्या दिवशी युवतींची शारीरिक चाचणी तर युवकांची उंची व वजन चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २१ नोव्हेंबरला पलाडी ते कोका रोड या मार्गावर धावण्याची स्पर्धा घेण्यात येईल. त्यात गुणवत्ता श्रेणीत येणाऱ्या युवक - युवतींची निवड होणार आहे. ही धावण्याची स्पर्धा युवकांसाठी ५ कि.मी. तर युवतींसाठी ३ कि.मी.ची राहणार असून हे अंतर अर्ध्या तासाच्या आत गाठायचे उद्दिष्ट्ये ठेवलेले आहे. अनेक दिवसांपासून सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार झालेली आहे. अनेक ठिकाणी चाचपणी करूनही युवकांना रोजगार मिळत नसल्याने वनविभागाच्या भरती प्रक्रियेत उच्चशिक्षित उमेदवारांनी मोठ्या उमेदीने अर्ज सादर केलेले आहेत.
या भरती प्रक्रियेतून त्यांना नोकरीची संधी मिळेल अशी आशा उराशी बाळगून अनेक युवक भंडारा शहरात दाखल होत आहेत. ही भरती प्रक्रिया पारदर्शकतेत पार पाडावी यासाठी वनविभागाचे सुमारे ७० वनकर्मचारी या प्रक्रियेदरम्यान डोळ्यात अंजन घालून कारवाई जबाबदारीने पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. (शहर प्रतिनिधी)
भरती प्रक्रियास्थळी मिळणार सुविधा
भरती प्रक्रिया राबविताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भंडारा वनविभागाने पोलीस प्रशासनासह वन कर्मचाऱ्यांची मदत घेतलेली आहे. सोबतच वैद्यकीय सुविधाही भरती प्रक्रिया स्थळी ठेवण्यात आलेली आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पाडावी यासाठी वरिष्ठांच्या निर्देशाचे पालन करण्यात येत आहे. कुणाला भूलथापा देऊन नोकरी लावून देण्याचे आमिष मिळत असल्यास अशा बाबीस बळी न पडता त्याची तक्रार वनविभागाकडे करावी. सोबतच भरती प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यास त्याचीही तक्रार विभागाकडे करता येईल.
- उमेश वर्मा
उपवनसंरक्षक, भंडारा.