घनकचऱ्याच्या विळख्यात ठाणाआरोग्य धोक्यात
By admin | Published: September 10, 2015 12:24 AM2015-09-10T00:24:17+5:302015-09-10T00:24:17+5:30
सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमध्ये घनकचरा साचल्याने व नाल्यालगत झाडी झुडपी वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
घनकचऱ्याच्या विळख्यात ठाणाआरोग्य धोक्यात : अंगणवाडीत विद्युत पुरवठा नाही, वॉर्ड क्रमांक चारमध्ये समस्याच समस्या
जवाहरनगर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमध्ये घनकचरा साचल्याने व नाल्यालगत झाडी झुडपी वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे.
भंडारा तालुक्यातील अधिक उत्पन्न मिळविणारी व नगरपंचायतीकडे वाटचाल करणारी दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप ही होय. येथे ग्रामविकास अधिकारी नियमित नसल्याने विकासाची कामे खुंटलेली आहे. येथील महात्मा गांधी वॉर्ड क्रमांक चारमध्ये तीन सदस्य आहेत. पैकी एक उपसरपंच भूषविणारा विद्यमान सदस्य आहे. तीनही सदस्य हे सत्तापक्षाचे मानले जात होते. मात्र मध्यंतरी काम करणाऱ्या शैलीवरून सत्ता पक्षात मतभेद उफाळून आले. परिणामी वॉर्डाचा विकास मंदगतीने सुरु आहे. यात इसराईल शेख ते टी.बी. उके यांच्या घरादरम्यान सांडपाणी वाहून जाणारी नालीमध्ये घनकचरा साचलेला आहे. या नालीलगत हिरवीगार झाडीझुडपी फोफावत आहे. या ठिकाणामागे विद्यमान उपसरपंच राहत आहेत. रोज ते या मार्गाने ये जा करीत असतात. मात्र ही बाब त्यांच्या लक्षात पडत नाही ही खेदाची बाब समजावी असा प्रश्न वॉर्डातील जनता करीत आहे. पदाधिकाऱ्यांच्या घरालगत जिल्हा परिषद शाळा आहे. येथील मोठे वृक्ष तुटून पडलेले आहे. लहान मुलांना व नागरिकांना या झाडापासून धोका होऊ शकतो. हे हटविण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याच ठिकाणी अंगणवाडी आहे. लहान मुलांसाठी पंख्याची सोय व्हावी या हेतूने ठराव घेण्यात आला. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले.
येथील मुले विना विद्युत प्रवाहाच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवीत आहे. गरोदर माता लहान बालके दैनिक तपासणीकरिता आले असता खोलीतील गरमीमुळे रडकुंडीला येतात. या समस्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अंगणवाडीत विद्युत पुरवठा देण्याची गरज आहे. (वार्ताहर)