तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:04 PM2018-03-10T23:04:02+5:302018-03-10T23:04:02+5:30
जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादात धारदार शस्त्रांनी मुकेश भिमराव भैसारे या ३६ वर्षीय तरूणाचा शुक्रवारला रात्रीच्या सुमारास बेला येथे खून केला होता.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादात धारदार शस्त्रांनी मुकेश भिमराव भैसारे या ३६ वर्षीय तरूणाचा शुक्रवारला रात्रीच्या सुमारास बेला येथे खून केला होता. या प्रकरणातील तीन आरोपींना भंडारा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चार तासात अटक केली.
अभिजीत केवल कोचे (२७) रा.मंगल पांडे वॉर्ड गणेशपूर भंडारा, सौरभ कवळू तांडेकर (१९) रा.शहापूर, व अमित राजकुमार गजभिये (२०) रा.शहापूर अशी आरोपींची नावे आहेत. भंडारा येथील रमाबाई आंबेडकर वॉर्डातील रहिवाशी असलेला मुकेश भैसारे हा बेला येथे एका दुकानात काम करतो. यापूर्वी आरोपी आणि मुुकेश यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी भंडारा पोलिसांनी भादंवि ३०७ कलमान्वये आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. या प्रकरणाची न्यायालयात अंतिम टप्प्यात सुनावणी असून आरोपी अभिजीत कोचे याने मुकेशला माघार घेण्यासाठी सांगितले. परंतु मुकेशने न एैकल्यामुळे वाद वाढत राहिला. अशातच त्याचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार घुसर यांनी त्यांचे पथकासह मोर्चेबांधणी करून व गुप्तचर यंत्रणा सक्रीय केले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारावर अवघ्या चार तासात नागपूर जिल्ह्यातील खात येथे धाड घालून अटक केली. अटकेनंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
सदर कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, प्रीतीलाल रहांगडाले, साकुरे, बोरकर, मोहरकर, मडामे, दिनेंद्र आंबेडारे, अतकरी, कडव, कडव, बोंदरे, वालदे, गजभिये, पोटे, चालक रामटेके यांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन चेके हे करीत आहेत.