घरफोडीचे तीन आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:28 PM2020-08-16T21:28:45+5:302020-08-16T21:29:04+5:30
१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने हत्तीडोई येथे अन्य दोघांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तालुक्यातील हत्तीडोई येथे घरफोडी करुन सोन्या-चांदीच्या ऐवजांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या तीन आरोपींना डीबी पथकाने अटक केली. विशेष म्हणजे १४ ऑगस्ट रोजी घडलेल्या एका चोरीच्या प्रकरणात तपासणीसाठी गेलेल्या पोलीस पथकाला बघीतल्यावर त्यातील एकाने पळ काढला. यावरुनच हत्तीडोई व अन्य ठिकाणी चोरी केल्याचे उघडकीला आले.
१४ ऑगस्ट रोजी भंडारा पोलीस ठाणे अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नेहरु वॉर्ड मेंढा येथे राहणाऱ्या कैलास उर्फ टपोरी सुखदेव मुटकूरे याची तपासणी करण्याकरिता पोलीस पथक पोहोचले. पोलिसांना पाहून तो पळू लागल्याने त्यावर संशय बळावला. त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने हत्तीडोई येथे अन्य दोघांच्या मदतीने चोरी केल्याचे कबुल केले. यात त्याला अभिषेक उर्फ पांग्या रामभाऊ चंदनबटवे, सुनील उर्फ गुड्डू सोमाजी उरकुडे दोन्ही रा. मेंढा यांना ताब्यात घेतले. जून महिन्यात हत्तीडोई येथे घरफोडी केली होती. याशिवाय भंडारा येथील ग्रामसेवक कॉलोनीत चोरी करुन दहा हजारांचा ऐवज तर तुलसीनगरात रात्री दरम्यान घरफोडी करुन १३ हजारांची रोख रक्कम व शास्त्री नगर परिसरात एका घरात चोरी करुन ३० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिणे चोरल्याचे कबूल केले.
तिघांकडून २ लक्ष पाच हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, एसडीपीओ रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बंडोपंत बन्सोडे, पीएसआय अमरदीप खाडे, हवालदार श्रीवास, भुसावळे, प्रशांत भोंगाडे, साजन वाघमारे, शिपाई अजय कुकडे, भेनाथ बुरडे, संदिप बन्सोड यांनी केली.