१.४१ कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहारात तीन केंद्रचालकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 01:37 PM2024-05-24T13:37:20+5:302024-05-24T13:38:46+5:30
दोन वर्षांनंतर कारवाई : आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केला तपास
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार चार वर्षांपूर्वी झालेल्या ५८ हजार ८९०.७६ क्विंटल धानाच्या अपहार प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या तीन केंद्रचालकांना अटक करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासानंतर आता विलंबाने का होईना, पण अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या केंद्रचालकांत सरांडी (बु) येथील नीलेश ठाकरे व पिंपळगाव (को) येथील दिनेश परशुरामकर आणि विनोद परशुरामकर या तीन केंद्रचालकांचा समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांना या अपहाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली. लेखापरीक्षण अहवालानुसार, चार वर्षांपूर्वी झालेल्या ५८ हजार ८९०.७६ क्विंटल धानाच्या खरेदीत अपहार झाल्याचे २०२१ मध्ये स्पष्ट झाले होते. त्यावरून विविध कलमाखाली चारही केंद्र चालकांविरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात एकाने न्यायालयातून जामीन मिळविल्याने आता उर्वरित तीन केंद्रचालकांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रानुसार, लाखांदूर येथील दी सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थांतर्गत सन २०१९-२० या वर्षात खरीप व रब्बी अंतर्गत धान खरेदीसाठी एकूण चार खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले होते. या केंद्रात सरांडी (बु) येथील दोन व भागडीसह पिंपळगाव (को) येथील प्रत्येकी एका केंद्रांचा समावेश होता.
दरम्यान, सरांडी (बु) येथील एका खरेदी केंद्रांतर्गत सुमारे ५००२.७६ क्विंटल धानाची हेतुपुरस्पर नासाडी करण्यात आल्याचा ठपका अहवालातून ठेवण्यात आला होता, तर सरांडी (बु) येथीलच अन्य एक केंद्रांसह भागडी व पिंपळगाव येथील केंद्रांतर्गत सुमारे ८८८ क्विंटल धानाची तूट आढळून आल्याचे अहवालात म्हटले होते. विशेष म्हणजे लेखापरीक्षण अहवालातून या बाबी स्पष्ट झाल्यावर १ कोटी ४१ लाख रुपयांच्या एकूण ५८८०.७६ क्विंटल धानाचा अपहार झाल्याचा आरोप करून संबंधित केंद्र चालकांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. तक्रारीवरून तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी चारही केंद्र चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला होता. त्यानुसार या विभागाचे पोलिस उपनिरीक्षक संजय सिंह ठाकूर, पोलिस हवालदार अशोक लुलेकर, आश्विन गोस्वामी व महिला पोलिस अंमलदार सुनीता मारबते आदी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोन वर्षांनंतर या केंद्रचालकांना अटक केली.
लेखापरीक्षकांनी केली होती तक्रार
लाखांदूर येथील दि सहकारी शेतकी खरेदी-विक्री संस्थेअंतर्गत संबंधित केंद्रांच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लेखापरीक्षणानुसार सदर केंद्रांतर्गत १ कोटी ४१ लाख रुपयांच्या धानाचा अपहार उघड झाला होता. या अपहारप्रकरणी जिल्हा लेखापरीक्षण अधिकारी व स्थानिक लाखांदूरचे सहायक निबंधक यांच्या निर्देशानुसार लेखापरीक्षक देवदास अन्नपूर्णे यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांत चार केंद्रचालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.