तीन वर्गखोल्या अन् सात वर्ग, त्यातही ओलच ओल...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:24 IST2024-07-26T12:23:02+5:302024-07-26T12:24:27+5:30
बोथली शाळेची अवस्था : प्रशासन निद्रावस्थेत, धोकादायक स्थिती विद्यार्थी घेताहेत शिक्षण, पालकांची तक्रार

Three classrooms and seven classes, even in that are dangerous
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथली येथील तीन वर्ग खोल्या पावसाच्या पाण्याने गळतात. भिंतीवाटे गळलेले पाणी वर्ग खोल्यात पसरते. बसायला दुसरीकडे जागाच नाही. त्यामुळे तीन वर्ग खोल्यात सात वर्गाचे विद्यार्थी कोंबून घेतले जातात. वर्गभर पसरलेल्या पाण्याच्या ओलाव्यात विद्यार्थ्यांना दिवसभर बसावे लागत आहे. धोकादायक दोन वर्गखोल्या असल्याची कल्पना शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला दिली आहे. प्रशासनाने या लहान बालकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे काय, असा प्रश्न पालकांनी केला आहे.
पावसाळ्यात भिंतीला ओल आलेली असते. वर्ग खोल्यात भिंतीतून झरपत आलेले पाणी शाळेच्या इमारतीला धोका निर्माण करू शकते. तीन खोल्यात पहिली ते सातवीपर्यंतचे एकूण ६५ विद्यार्थी कोंबल्यासारखे बसविले जातात. विद्यार्थ्यांना खाली अंथरलेल्या चटईवर बसवले जाते. आपण या धोकादायक इमारतीत बसतो, अध्यापन-अध्ययन करतो त्या बालकांना अजिबात कल्पना नाही.
यमाच्या रूपाने चार भिंती कधी दगा देतील याच्या नेम राहिला नाही. शिक्षकांना मात्र भविष्यात घडणाऱ्या या धोकादायक वर्ग खोल्यांची कल्पना आलेली असली तरी ते मात्र कुठेच वाच्यता करू शकत नाही. संकटाची चाहूल आधीच शाळा व्यवस्थापनाला लागली होती. त्यामुळे बोथली शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने या धोकादायक वर्ग खोल्यांची माहिती ठरावासकट ७ मार्च रोजीच लेखी पत्र देऊन प्रशासनाला करून दिली होती. त्या पत्रात इमारत कधीही पडू शकते. जीवितहानी होऊ शकते. त्या जुन्या इमारती निर्लेखित करण्यात याव्या, अशी गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात शाळा व्यवस्थापन समितीने आणून दिली होती. त्यावर कोणतीच अद्याप कार्यवाही झाली नाही. त्यामुळे प्रशासनाला या लहान बालकांच्या जीवांशी देणेघेणेच नाही का, अशी संतप्त विचारणा आता पालक वर्गातून होत आहे.
एका खोलीत तीन तीन वर्ग
बोथलीच्या जिल्हा परिषद शाळेला चार वर्ग खोल्या आहेत. त्यापैकी तीन खोलीत विद्यार्थी बसवले जातात. एका खोलीत तीन वर्गाचे विद्यार्थी तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्गखोल्यात दोन वर्गाचे विद्यार्थी बसविले जातात. त्या तीनही वर्गखोल्या धोकादायक असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे.
"जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोथली शाळेचा इमारती निर्लेखनबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना २२ मार्च रोजी पाठविण्यात आला आहे."
- मनीषा गजभिये, गटशिक्षणाधिकारी, मोहाडी
"जिल्हा प्रशासनाला आमच्या मुलांच्या जीवाची किंमत नाही काय, आठवड्याभरात इमारत निर्लेखनाची कार्यवाही करावी. अन्यथा शाळा बंद करण्याच्या विचार केला जाईल."
- गुरुदेव बाभरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, बोथली.