शहरात घनकचरा व्यवस्थापनेचे तीनतेरा
By admin | Published: April 15, 2017 12:26 AM2017-04-15T00:26:05+5:302017-04-15T00:26:05+5:30
दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहेत.
नाल्यांमध्ये तुंबला कचरा : कचरा कंटेनर ओव्हरफ्लो
इंद्रपाल कटकवार भंडारा
दीड लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरातील घनकचरा व्यवस्थापनेचे धिंडवडे निघाले आहेत. नगरपालिका मध्ये सत्तापरिवर्तन होऊन चार महिन्यांचा कालावधी होत असला तरी शहराचे रंगरूप बदलेल अशी आशा होती. मात्र जिकडे तिकडे पसरलेला कचरा, दूषित पाणी पुरवठा, पार्किंगची अव्यवस्था, आठवडी बाजारातील दुरवस्था आदी समस्या अजूनही जैसे थे आहेत.
तांदळाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयी जशा सुविधा शहरवासीयांना अपेक्षित आहेत, तशा उपलब्ध नाहीत. दीड लक्ष लोकसंख् या असलेल्या भंडारा शहरात कुठेही महिलांसाठी शौचालय तथा मुत्रीघराची व्यवस्था नाही. उद्याने, अरुंद रस्ते व दूषित पाणी पुरवठा तसेच अतिक्रमणाचा फटका ही मुख्य बाबी शहराच्या विकासाला गालबोट लावत आहेत. विकासाचे राजकारण चालत असले तरी गल्लीबोळीतील अस्वच्छता मुख्य रस्त्यावर चर्चेचा विषठ ठरलेला आहे. ऐन बाजाराच्या दिवशी स्वच्छतेचा बोजवारा उडालेला दिसून येतो. शहराची व्याप्ती लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाकडे पुरेशी यंत्रणा आहे किंवा नाही ही बाब त्या विभागालाच ठाऊक असावी. ठिकठिकाणी कचरा कंटेनरची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिकांची मानसिकता कचरा कंटेनर ऐवजी बाहेर फेकण्याचीच जास्त आहे. यासाठी पालिका प्रशासनाचे कर्मचारीही हतबल आहेत.
लक्षावधी रुपये खर्चून दाभा येथे घनकचरा निर्मूलन व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संयत्र उभारण्यात आला होता. आजघडीला तो संयत्र धुळखात आहे. लक्षावधी रुपयांची उलाढाल घनकचरा व्यवस्थेपोटी होत असली तरी शहराचे सौंदर्यीकरण खरच कुठेतरी हरपले आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व नागरिकांची मानसिकता ही दोन प्रमुख कारणे यासाठी कारणीभूत ठरताहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.