सिहोरा परिसरात तीन विद्युत फिडर बंद
By Admin | Published: April 8, 2016 12:37 AM2016-04-08T00:37:37+5:302016-04-08T00:37:37+5:30
सिहोरा परिसरात नागरिकांना विज पुरवण्याची दर्जेदार सेवा देण्यासाठी स्थानिक यंत्रणे मार्फत प्रयत्न केले जात असले ...
अल्प दाब पुरवठ्याने नागरिक त्रस्त : जिल्हा विभागाची मंजुरी अडली, स्थानिक यंत्रणेची डोकेदुखी
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात नागरिकांना विज पुरवण्याची दर्जेदार सेवा देण्यासाठी स्थानिक यंत्रणे मार्फत प्रयत्न केले जात असले तरी जिल्हा विज वितरण कंपनीचे कार्यालय असहकार्याची भूमिका घेत असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरात अतिरिक्त तीन फिडर मंजुरी अभावी बंद असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सिहोरा परिसरातील नागरिकांना भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे लागले आहे. ३३/११ केव्हीचे उपकेंद्र मंजुरी नंतर सिंगल फेज योजना घरगुती विज ग्राहकासाठी सुुरू करण्यात आली आहे. या योजनेचे २४ तास विज पुरवठा करण्याचे स्वरूप आहे. यामुळे या परिसरात भारनियमन होत नाही. परंतु नव्या समस्येला नागरिकांना सामोरे जाण्याची पाडी आली आहे. सिंगल फेज योजनेमुळे नागरिकांना अल्प विजेच्या दाराचा पुरवठा होत असल्याने कुलर, पंखे व विजेचे उपकरण शोभेची वस्तु ठरत आहे. ही बाब स्थानिक यंत्रणे मार्फत गंभीरतेने घेण्यात आली आहे. ९४०० घरगुती व २५०० कृषीपंपधारक विजेचा वापर करणारे ग्राहक आहेत.
या विज ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यासाठी चांदपुर, सिहोरा, बपेरा असे तीन फिडर सुरूवातीला तयार करण्यात आली आहे. ४३ गावात या तीन फिडर वरून विजेचा पुरवठा होत असल्याने अल्प दाब पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी स्थानिक यंत्रणे मार्फत सिंदपुरी, कर्कापूर, सिलेगाव असे तीन फिडर नव्याने तयार केली आहे. खांब व विजेचा तार जोडणी संपूर्ण कामे पूर्ण झाली आहे. परंतु या तीन फिडरला सुरू करण्याची मंजुरी जिल्हा विज वितरण कंपनी कार्यालयाने दिली आहे.
यामुळे नागरिक व स्थानिक यंत्रणेची डोके दु:खी वाढली आहे. स्वतंत्र असे सहा फिडर तयार करण्यात आले असताना तीन फिडर सुरू करण्याची मंजुरी गुलदस्त्यात आहे. अल्प दाब विज पुरवठा होत असल्याने ग्राहकांची ओरड सुरू झाली आहे. स्थानिक कार्यालयात नागरिकांची रोज गाऱ्हाणे मांडण्यासाठी गर्दी होत असताना बंद असलेले तीन फिडर सुरू करण्याची मंजुरी अद्याप देण्यात आली नाही.
या परिसरात घरगुती विज ग्राहकांना सिंगल फेज व कृषी पंप धारकांना थ्री फेज विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु सिहोऱ्यात असणाऱ्या कार्यालयात सिंगल फेज योजनेचे साहित्य उपलब्ध नाही. थ्री फेज योजनेचे साहित्याचा पुरवठा करण्यात येत आहे. केबल व ग्रीप आदी साहित्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विज ग्राहकांनी विजेची दर्जेदार सेवा देण्यासाठी शेत शिवारातून खांब उभे करण्यात आले आहे. ही खांब वाकली असून जिवंत विद्युत तारा लोंबकळत आहेत. या खांबाची देखभाल व दुरूस्ती करण्याची ओरड आहे. सिहोरा कार्यालयात ४३ गावे जोडण्यात आली असून स्वतंत्र दोन शाखा अभियंते कार्यरत आहेत. यात १५ लाईनमन कार्यरत आहेत. एक महिला लाईनमन कार्यरत आहे. बंद असणारे तीन फिडर तात्काळ सुरू करण्याची मंजुरी देण्याची ओरड आहे. (वार्ताहर)