तीन लाख 47 हजार तरुणांनी घेतली काेराेना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 05:00 AM2021-09-08T05:00:00+5:302021-09-08T05:00:39+5:30
जागतिक स्तरावर तिसरी लाट सुरु झाली आहे. आपल्या देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काेराेना लसीकरण झालेल्यांची बाधित हाेण्याची शक्यता ३० टक्याने खाली आली आहे. तर मृत्यू हाेण्याचे प्रमाण ९५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक झाले आहे. त्यातही तरुणांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुढे आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काेराेना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्याही लाटेत सर्वाधिक रुग्ण १८ ते ४४ वयाेगटातीलच हाेते. आता संभाव्य तिसरी लाट येत असल्याने या वयाेगटाचे लसीकरण माेठ्या प्रमाणात करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने घेतले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयाेगटातील ३ लाख ४७ हजार १४५ व्यक्तींनी काेराेना लस घेतली आहे. मात्र ज्येष्ठांच्या तुलनेत आजही ही संख्या कमी आहे.
काेराेना आजाराचा सामना करण्यासाठी लस हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने माेठ्या प्रमाणात काेराेना लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ६ लाख ६२ हजार ८३४ तर दुसरा डाेस १ लाख ८६ हजार ४६४ व्यक्तींनी घेतला आहे. पहिला आणि दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या आता ८ लाख ४९ हजार २९८ झाली आहे. त्यात १८ ते ४४ वयाेगटातील तीन लाख ४७ हजार १४५ तर ४५ वर्षावरील ५ लाख १ हजार ७० व्यक्तींनी काेराेना लस घेतली आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी ९ लाख ६५ हजार व्यक्ती पात्र आहेत. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ग्रामीण भागात काेराेना लसीकरणाबाबत माेठ्या प्रमाणात गैरसमज हाेते. अनेकजण काेराेना लस घेण्यासाठी तयार हाेत नव्हते. मात्र जिल्हा प्रशासनाने व्यापक जनजागृती माेहिम राबवून गैरसमज दूर केले. आता जिल्ह्यात वेगाने लसीकरण सुरु आहे. गावागावांत लसीकरणासाठी शिबिरांचे आयाेजन करण्यात येत आहे. नागरिकांचा तेवढाच उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जागतिक स्तरावर तिसरी लाट सुरु झाली आहे. आपल्या देशातही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. काेराेना लसीकरण झालेल्यांची बाधित हाेण्याची शक्यता ३० टक्याने खाली आली आहे. तर मृत्यू हाेण्याचे प्रमाण ९५ टक्केपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे लस घेणे आवश्यक झाले आहे. त्यातही तरुणांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुढे आले आहे.
जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध असून लसीकरणासाठी शहरी व ग्रामीण भागात शिबिर लावण्यात येत असल्याची माहिती आराेग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
लसीकरणात महिलाच आघाडीवर
- भंडारा जिल्ह्यात लसीकरणात महिला आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. चार लाख २८ हजार २१५ महिलांनी लस घेतली असून चार लाख २० हजार ९७८ पुरुषानी लस घेतली आहे. विशेष म्हणजे महिलांपेक्षा काेराेनाबाधितांचे प्रमाण पुरुषांमध्ये दिसून आले हाेते. त्यानंतरही पुरुष लस घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
पाच लाख ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस
- जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख एक हजार ७० ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. ४५ वर्ष वयाेगटातील ही मंडळी आहे. काेराेना लसीकरणात याच वयाेगटातील सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण झाल्याचे भंडारा जिल्ह्यात दिसून येत आहे.